वरळीतील मोर्चात जाब विचारणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्तेंची तक्रार

मुंबई | मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने वरळी पोलीस स्थानकात धाव घेत संबंधित महिलेविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपकडून वरळीतील जांबोरी मैदानापासून एनएससीआय डोमपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यावेळी एका स्थानिक महिलेने संताप व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनाला अडवून मोर्चामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
हेही वाचा
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी
पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप
दरम्यान, मोर्चादरम्यान संबंधित महिलेने पोलिस बंदोबस्तात असलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर वरळी पोलीस या प्रकरणात पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





