डिलिमीटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा सवाल

मुंबई | केंद्र सरकारचे महिला आरक्षण म्हणजेच ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक संसदेत दोन तृतीयांश बहुमताअभावी मंजूर होऊ शकले नाही. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर महिला विरोधी असल्याचा आरोप केला. विरोधक सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहेत, असे सांगून काही होणार नाही. मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. कारण देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित, हुशार आहेत, ते खूप वाचनही करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा वेगळी होती. पण एनडीए आघाडीतील सर्व पक्षांनाच एक ब्रिफिंग दिले जाते, त्यांना एक नोट पाठवली जाते. ते स्वत:च्या मित्रपक्षांनाही नोट पाठवतात आणि सगळे त्या मुद्द्यावर एकाच सुरात बोलतात. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. महिला आरक्षण विधेयक हे 2023 मध्येच पास झाले आहे हे देवेंद्र फडणवीस यांना 2000 टक्के माहिती आहे. पण दिल्लीवरुन त्यांना नोट आली असेल किंवा प्रेशर आलं असेल पक्षाची हीच लाईन लावून धरा.
हेही वाचा : विरोधकांनी महिलांच्या अधिकारांची ‘भ्रूणहत्या’ केली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नारीशक्ती वंदन अधिनियम जो निर्णय घेतला, तो संसदेत 20 सप्टेंबर 2023 ला एकमताने मंजूर झाला होता. 21 तारखेला हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. त्यानंतर 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली. त्याची अंमलबजावणी 2024 ला झाली पाहिजे होती. आम्ही या क्षणापासून महिला आरक्षण लागू करा, हे ठामपणे सांगतोय. लोकसभेच्या 543 जागांमध्ये 33 टक्के महिलांना लगेच आरक्षण द्या, हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे, 2023 साली मंजूर झालेले विधेयक 2026 उजाडलं तरी लागू का झाले नाही? डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50 टक्के जागा प्रत्येक राज्यात वाढवणार असं आम्हाला सांगितले होते. मग ते विधेयकात का नव्हते? मुख्यमंत्री महिला आरक्षणाबाबत खोटं बोलत आहेत, असे मला म्हणायचे नाही. मात्र, यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयार आहे. मुख्यमंत्री म्हणतील ती जागा आणि वेळ मला मान्य आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलेले आव्हान स्वीकारले.





