Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘पोलीस दलाची कार्यक्षमता व बौद्धिक वाढीसाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार’; केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय

नागपूर : पोलीस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचे कौशल्य या मेळाव्यामुळे अधोरेखित झाले असून तपासातील गुणवत्ता व कार्यक्षमता वाढीसाठी हे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकसीत भारतासाठी आंतरिक सुरक्षिततेची भक्कम जोड असणे आवश्यक आहे. ती जोड अशा मेळाव्यातून साध्य होत असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी काढले.

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा 2025-26 च्या औचित्याने दिनांक 29 मार्च ते 3 एप्रिल कालावधीत पार पडलेल्या विविध स्पर्धांचा समारोप आज केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्याहस्ते पार पडला. नागपूर सिटी पोलीस मुख्यालयाच्या शिवाजी स्टेडियम येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात देशभरातील 29 राज्यांतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केंद्रीय दलांचाही त्यात सहभाग होता. यावेळी विविध स्पर्धांमध्ये अव्वल आलेल्या राज्यांच्या संघांना गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.

या समारोपीय कार्यक्रमास पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, मधूकर पांडे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, अप्पर पोलीस महासंचालक प्रविण साळूंखे, पोलीस महानिरिक्षक निसार तांबोळी, विशेष पोलीस महानिरिक्षक संदीप पाटील, इंटलिजेन्ट ब्युरोचे उपनिदेशक प्रदीप शेज्युळ आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृह राज्यमंत्री रॉय म्हणाले की, या मेळाव्यात लघु भारत दिसत असून देशभरातील पोलीस दल यात समाविष्ठ आहेत. या आयोजनात प्रतिभा व अनुशासनाचे प्रदर्शन दिसून येत असून देशासाठी या स्पर्धा प्रेरणादायी ठरतील असा विश्वास यांनी व्यक्त केला. पोलीस दलाने आधूनिक तंत्रज्ञानाची कास धरुन एआयद्वारे महत्वपूर्ण भूमिका साकारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांचे अभिनंदन केले. तपास प्रक्रियेत स्वान स्कॉडची भूमिका पोलीस दलात महत्वपूर्ण ठरत आहे. अनेक गुन्ह्यात त्यांची भूमिका योग्य ठरली असून आधूनिक क्षमता दर्शविण्यातही ते पात्र ठरले आहेत.

अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धेत सर्वोच्च विजेता तेलंगना संघ ठरला. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर अवेअरनेस अंतर्गत ‘ऑफिस ऑटोमेशन’ स्पर्धेत तेलंगना संघ विजेता तर बीएसएफ संघ उपविजेता ठरला. सायंटिफिक एज टू इन्व्हेस्टिगेशन या प्रकारात तामिळनाडू अ संघ विजेता ठरला. उपविजेता तेलंगना संघ ठरला असून कास्यपदकाचा मानकरी तामिळनाडू ब संघ ठरला. पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत बीएसएफ संघ विजेता ठरला असून उपविजेता तेलंगना संघ ठरला. ‘अँटी सबोटाज चेक’ या स्पर्धेत तेलंगना संघ विजेता ठरला असून उपविजेता महाराष्ट्र संघ ठरला. पोलीस व्हिडिओग्राफी स्पर्धेत तेलंगना विजेता ठरला असून उपविजेता महाराष्ट्र संघ ठरला. कॉम्प्युटर अवेअरनेस या स्पर्धेत तेलंगना संघ विजेता तर बीएसएफ संघ उपविजेता ठरला. वेस्टआयटी स्पर्धेत आयटीबीपी संघाचे मनोजसिंग बिस्ट व अविन विजेता तर महाराष्ट्र संघाचे अकोलाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व मजिद खान पठाण उपविजेते ठरले.

पोलिस डॉग स्पर्धा व डॉग बॉबी या दोन्ही स्पर्धेत सीआरपीएफ विजेते ठरले.

या मेळाव्यात ‘कॉम्प्युटर अवेअरनेस’, ‘पोलिस डॉग स्पर्धा’, ‘पोलिस व्हिडिओग्राफी’, ‘अँटी सबोटाज’ तपासणी, ‘सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन’ आणि ‘पोलिस फोटोग्राफी’ अशा सहा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे या स्पर्धांनी पोलीस दलातील तांत्रिक ज्ञान आणि तपासाचे कौशल्य अधोरेखित केले आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य श्रीमती रिना जनबंधू तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button