Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Water supply planning: ‘‘जलस्वयंपूर्ण पिंपरी-चिंचवड’’ संकल्पनेसाठी भाजपा आग्रही!

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । सुमारे ४० लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत पाणी प्रश्नावर आगामी २५ वर्षांचे नियोजन करणे आणि शहराला ‘जलस्वयंपूर्ण’ करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रही पाठपुरावा करीत आहे. त्यासाठी महापौर रवि लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप यांच्यासह सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे आपआपल्या पातळीवर प्रभावशाली पाठपुरावा करीत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या आंद्रा, भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दोन दिवसांपूर्वी महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. संबंधित ठेकेदाराचे काम प्रशासनाने रद्द केले आहे. त्या ठिकाणी नवीन ठेकेदार नियुक्ती करावा आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली होती.

तत्पूर्वी, महाराष्ट्र विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांनी शहराच्या आवश्यकतेनुसार, अतिरिक्त जलस्त्रोत निर्मिती, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरू करणे याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. चासकमान धरणातून आणि मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आरक्षीत करावे, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे, पवना धरणातून अतिरिक्त १०० एमएलडी पाणी आरक्षणासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक आश्वासनही दिले आहे.

हेही वाचा –  मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! MPSC मार्फत भरती प्रक्रिया जलदगतीने घेण्याबाबत मोठा निर्णय; सोमवारी महत्त्वाची बैठक…

दरम्यान, महानगरपालिका अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी शहराचा पाणी पुरवठा आणि अपेक्षीत कार्यवाही यावर सभागृहात प्रभावी मागणी केली. सर्वसामान्य नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्याबाबत भारतीय जनता पार्टी व आम्ही सर्व नगरसेवक कटिबद्ध आहोत. त्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी कार्यवाही करावी, असे ठणकावले होते.

विशेष म्हणजे, प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पाणी पुरवठा योजनांसाठी शून्य इतकी तरतूद होती. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी ही तरतूद ५० कोटींची केली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनांना चालना मिळणार असून, निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण होणार आहेत.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सातत्त्याने विविध स्तरावर आढावा बैठका, पाहणी दौरा करीत आहेत. तसेच, शहरातील भाजपा आमदार राज्य शासनाकडे प्रभावीपणे मागणी करीत आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शहरातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सकारात्मक दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासन आता ‘अलर्ट मोड’ वर असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही पाणी पुरवठ्याच्या मुद्याला प्राधान्याने हातात घेतले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे, हा शहरवासीयांचा हक्क आहे. त्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी सक्षमपणे पाठपुरावा करीत आहेत. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या पाहणीसाठी विरोधी पक्षनेतासुद्धा आले होते. या प्रकल्पाच्या जुन्या ठेकेदाराने ४ वर्षे प्रकल्प रखडवला. त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. नवीन निविदा प्रक्रिया राबवून ८ महिन्यांमध्ये सदरचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे १६७ एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड, पुणे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करता अतिरिक्त जलस्त्रोत निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणे. नवीन जलस्त्रोत निर्माण करुन पाणी पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्यात येत आहे. आगामी काळात पाण्यासाठी पिंपरी-चिंचवड आत्मनिर्भर होईल, असा विश्वास आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

पिंपरी-चिंचवडकरांना पाणी पुरवठा सक्षमपणे देण्याकामी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्या सहकार्याने तसेच महापालिकेतील महापौर, सत्तारुढ पक्षनेते यांच्या नेतृत्त्वामध्ये आम्ही पाणी पुरवठा योजनांना पहिले प्राधान्य दिले आहे. अर्थसंकल्पात पाणी योजनांना निधी कमी पडणार नाही. त्यामुळे संबंधित प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होतील, यात शंका नाही.
– अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड, पुणे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय काळात पाणी पुरवठा योजनांचे प्रकल्प रखडले आहेत. महापालिका सभागृहामध्ये आता लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या जीवनाशी निगडीत प्रमुख प्रश्न असलेल्या पाणी पुरवठाबाबत आम्ही संवेदनशील आहोत. पवना योजनेतील पाणी उपसा रावेत बंधाऱ्यातून आणि आंद्रा योजनेतील पाणी उपसा निघोजे बंधाऱ्यातून होतो. त्या ठिकाणी पाणी प्रदूषणाची गंभीर समस्या आहे. त्यासाठी टर्शरी ट्रिटमेंट प्लँट उभारणे आणि प्रस्तावित प्रकल्प कालबद्ध नियोजन करुन पूर्ण करणे, असे ध्येय आहे.
– प्रशांत शितोळे, सत्तारुढ पक्षनेता, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button