बसमध्ये लहान मुलांचा वापर करून दागिने चोरी करणारी महिला टोळी अटकेत
गुन्हे शाखा युनिट-३ ची उल्लेखनीय कारवाई; ८९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड | बसमध्ये लहान मुलांना सोबत घेऊन प्रवाशांचे लक्ष विचलित करत सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला टोळीला गुन्हे शाखा युनिट-३ ने अटक केली आहे. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १४७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-३ कडून करण्यात येत होता.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंत विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपी रिक्षा व ट्रकचा वापर करून पसार होत असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे जातेगाव (ता. शिरूर) येथे सापळा रचून सहा महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : Positive News: बेपत्ता आकाशचा १८ दिवसांनंतर अखेर सुखरूप शोध
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनुराधा ऊर्फ पार्वती मंगेश बुदिनाथ (३०), अंजली राम बुद्धिनाथ (२१), राधा चरण वैद (२१), कल्पना बाला वैद (२१), श्वेता उमर वैद (२१) आणि जानकी अनिल वैद (३०) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने केली.
गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे बसमधील प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, अशा प्रकारच्या टोळ्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.





