निगडीतील डॉ. अरविंद बी. तेलंग महाविद्यालयात ‘हॅकेथॉन’वर विशेष व्याख्यान
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये व करिअर संधींचे मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड | कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. अरविंद बी. तेलंग वरिष्ठ महाविद्यालय, निगडी येथे संगणक शास्त्र (B.Sc. CS) विभागाच्या वतीने “Transformative Power of Hackathon” (हॅकेथॉनची परिवर्तनीय शक्ती) या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील एकूण ६४ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी येथील इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे असोसिएट डीन (स्टुडंट अफेअर्स) डॉ. सुनील महाजन उपस्थित होते.
हेही वाचा : राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्त्याच्या कामाला गती!
डॉ. महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे विविध फायदे, तांत्रिक कौशल्यांचा विकास, तसेच करिअर घडविण्यात त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी कशा उपयुक्त ठरतात, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका राधिका खिस्ते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहाय्यक प्राध्यापिका शर्मिला लाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.सी.एस.ची विद्यार्थिनी साक्षी वाकोडे हिने केले. शेवटी सहाय्यक प्राध्यापिका प्रज्ञा राजेश्वरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
“हॅकेथॉन ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, समस्यांवरील उपाय शोधण्याच्या क्षमतेला आणि टीमवर्कला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांत सहभाग घेतल्यास तांत्रिक कौशल्यांसोबतच आत्मविश्वास आणि करिअरच्या नव्या संधीही निर्माण होतात.”
– डॉ. सुनील महाजन.





