इराणचे दिमोना-अरादवर क्षेपणास्त्र हल्ले; १००हून अधिक जखमी

Iran Israel war | मध्यपूर्वेत इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून हल्ले-प्रतिहल्ल्यांची मालिका सुरूच आहे. इराणकडून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला बहुतांश क्षेपणास्त्रे रोखण्यात यश आले असले, तरी काही क्षेपणास्त्रे लक्ष्यभेद करण्यात यशस्वी ठरली आणि त्यातून मोठे नुकसान झाले.
दक्षिण इस्रायलमधील दिमोना शहरावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आगीचे मोठे गोळे शहरावर आदळताना दिसत आहेत. दिमोना येथे इस्रायलचे महत्त्वाचे अणुसंशोधन केंद्र आहे. या परिसरातील हवाई संरक्षण व्यवस्था भेदून क्षेपणास्त्रे आत घुसण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : अशोक खरातकडे जाणाऱ्या सगळ्या मंत्र्यांना सहआरोपी करा; संजय राऊतांची मागणी
युद्धाच्या चौथ्या आठवड्यात प्रवेश करत असताना हा संघर्ष अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचे चित्र आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, दिमोना आणि अराद या शहरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. किमान दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्यात इस्रायली संरक्षण यंत्रणा अपयशी ठरल्याचेही समोर आले आहे.
दिमोना हे अणुसंशोधन केंद्राच्या पश्चिमेला सुमारे २० किमी अंतरावर आहे, तर अराद हे शहर उत्तरेला सुमारे ३५ किमीवर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या, मात्र अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी न झालेल्या व्हिडिओंमध्ये, क्षेपणास्त्रांच्या स्फोटामुळे इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. घरांच्या खिडक्या-दारांचे तुकडे उडाले असून घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचेही दृश्यांमध्ये आढळते.





