PCMC | मोशी प्रभाग-२ मध्ये वाहतूक कोंडीवर निर्णायक पाऊल!
नगरसेवक निखील बोऱ्हाडे यांचा ‘नो पार्किंग’ झोनसाठी पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड | मोशी प्रभाग क्रमांक ०२ मधील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरसेवक निखील बोऱ्हाडे यांनी पुढाकार घेत वाहतूक विभागाकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत. प्रमुख सिग्नल चौकांपासून १०० मीटर परिसर ‘नो पार्किंग’ घोषित करण्यासह बोऱ्हाडेवाडी ३१ मीटर रोडवर जड वाहनांसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोशी प्रभाग क्रमांक 02 मधील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग व अपघातांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नगरसेवक निखील शिवाजी बोऱ्हाडे यांनी पुढाकार घेतला आहे. आदरणीय महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विषयावर चर्चा करून बोऱ्हाडे यांनी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडे लेखी निवेदन सादर केले.
हे निवेदन मा. पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग, Pimpri Chinchwad Police यांना देण्यात आले. यामध्ये प्रभागातील प्रत्येक प्रमुख सिग्नल चौकापासून किमान 100 मीटर अंतर दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग’ झोन घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
यावेळी नगरसेवक बोऱ्हाडे यांनी पुढील उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली आहे – सर्व सिग्नल चौकांपासून 100 मीटरपर्यंत स्पष्ट ‘नो पार्किंग’ झोन जाहीर करून फलक व रस्ते चिन्हांकन करणे. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाईसाठी वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करणे. आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही व डिजिटल साइनबोर्ड बसविणे. बोऱ्हाडेवाडी येथील 31 मीटर रोडवर जड वाहनांसाठी कायमस्वरूपी ‘नो पार्किंग’ झोन जाहीर करणे.
वाहतूक विभागाची पाहणी..
या संदर्भात वाहतूक विभागाचे पीआय रामचंद्र घोडके यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असून लवकरच संबंधित ठिकाणी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. नगरसेवक निखील बोऱ्हाडे यांच्या या पुढाकारामुळे मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरातील भारत माता चौक, लक्ष्मी चौक, श्रीराम चौक तसेच 31 मीटर रोड परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
“मोशी प्रभाग ०२ मधील नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. सिग्नल चौकांजवळील अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे १०० मीटर ‘नो पार्किंग’ झोन आणि ३१ मीटर रोडवर जड वाहनांसाठी कायमस्वरूपी बंदी ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.”
– निखील बोऱ्हाडे, नगरसेवक, मोशी.





