कुडाळ गणात ‘तिरंगी’ शड्डू! सोमनाथ कदमांच्या अपक्ष उमेदवारीने प्रस्थापितांची झोप उडाली; ‘जॉइंट किलर’ ठरणार का?

सातारा : जावली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कुडाळ पंचायत समिती गणाची निवडणूक आता एका अत्यंत चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गट आणि भाजप यांच्यात होणाऱ्या थेट लढतीचे चित्र सोमनाथ कदम यांच्या अपक्ष उमेदवारीने पूर्णपणे बदलले असून, येथे आता ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे.
बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
या गणात राष्ट्रवादी ( शरद पवार) गटाकडून आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र शिंदे रिंगणात आहेत, तर भाजप व महायुतीकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक सौरभ शिंदे नशीब आजमावत आहेत. या दोन प्रस्थापित शक्तींसमोर कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत आव्हान उभे केले आहे. कदम यांच्या एन्ट्रीमुळे प्रस्थापित पक्षांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
’ समस्या जाणून घेणारा नेता’ हीच ओळख
स्वर्गीय गणपत शंकर कदम (माजी व्हाईस चेअरमन, कुडाळ सोसायटी) यांचा वारसा सांगणारे सोमनाथ कदम आपल्या उप सरपंच पदाच्या कार्यकाळातील ‘भ्रष्टाचारमुक्त’ प्रतिमेच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. “मी मत मागायला नाही, तर तुमच्या समस्या जाणून घ्यायला आलो आहे,” ही त्यांची साधी पण प्रभावी भूमिका महिला आणि तरुण मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा – राज्यस्तरीय युनिफाईट ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या विद्यार्थ्यांची निवड
निवडणुकीचे कळीचे मुद्दे:
स्वच्छ प्रतिमा: भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेले नेतृत्व ही कदमांची मोठी ताकद.
थेट संवाद: जाहीर सभांचा गाजावाजा करण्याऐवजी गृहभेटी आणि वैयक्तिक गाठीभेटींवर भर.
कोणाचे गणित बिघडणार?: सोमनाथ कदम यांना मिळणारी मते राजेंद्र शिंदे की सौरभ शिंदे, यांपैकी कोणाची डोकेदुखी वाढवणार? यावरच विजयाचे समीकरण अवलंबून आहे.
”मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता कुडाळ गणात यावेळी ‘भाऊबंदकी’ आणि ‘पक्षीय राजकारण’ बाजूला सारून विकासाला आणि प्रामाणिकपणाला कौल मिळतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”कुडाळ गणाला आज अशा नेतृत्वाची गरज आहे ज्याची प्रतिमा स्वच्छ असेल आणि ज्याने सत्तेचा वापर लोकसेवेसाठी केला असेल. सोमनाथ कदम यांनी सरपंच असताना दाखवलेले कर्तृत्व आणि त्यांचा जनसंपर्क पाहता, सामान्य जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र दिसत आहे. ही निवडणूक प्रस्थापितांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरेल.”
— किरण पवार (सामाजिक कार्यकर्ते)
”राजकीय पक्षांच्या आश्वासनांना जनता कंटाळली आहे. सोमनाथ कदम हे लोकांच्या सुख-दुखात सहभागी होणारे कार्यकर्ते आहेत. ते अपक्ष असले तरी त्यांचा वैयक्तिक दांडगा संपर्क हीच त्यांची ताकद आहे. यंदा कुडाळ गणात परिवर्तनाची लाट असून कदम साहेब नक्कीच बाजी मारतील असा आम्हाला विश्वास आहे.”
— नितीन मोरे (कार्यकर्ते)




