ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीसाठी भारताचा महिला संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

IND-W vs AUS-W Test Squad | भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी असे तिन्ही फॉरमॅटमधील मालिका खेळवण्यात येणार आहेत.
एकदिवसीय आणि टी-२० मालिकांनंतर दौऱ्याचा शेवट पर्थ येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. हा कसोटी सामना ७ ते ९ मार्च २०२६ दरम्यान खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली हिच्या कारकिर्दीतील हा अखेरचा सामना ठरणार असून, तिने काही दिवसांपूर्वीच भारताविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा : अजित पवार महायुती सोडून महाविकास आघाडीत येतील; संजय राऊतांचा दावा
भारतीय संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे देण्यात आले असून, स्मृती मानधना उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. सलामीवीर शफाली वर्माला तिच्या अलीकडील उत्कृष्ट फॉर्मच्या जोरावर संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच या दौऱ्यासाठी प्रतिका रावलसह काही खेळाडूंना प्रथमच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीसाठी भारताचा संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायला सतघरे.




