वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड! किंग कोहलीला मागे टाकत रचला इतिहास; अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये केला पराक्रम

Vaibhav Suryavanshi Record : आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या बॅटने मोठी खळबळ माजवली आहे. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात वैभवने मैदानावर उतरताच अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्याने केवळ आपल्या कारकिर्दीतील १००० धावांचा टप्पा ओलांडला नाही, तर भारताचा महान फलंदाज विराट कोहलीलाही एका खास यादीत मागे टाकले आहे. त्याचबरोबर एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
यूथ वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत वैभवने आता विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने आपल्या यूथ वनडे कारकिर्दीत २५ डावांत ४६.५७ च्या सरासरीने ९७८ धावा केल्या होत्या. वैभवने मात्र अवघ्या २० डावांत ५० हून अधिकच्या सरासरीने विराटचा हा विक्रम मोडला असून, त्याने १००० धावांचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा – महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना मोठा दिलासा
यासह वैभवने अवघ्या ३० चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले, जे या विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक आहे. इतकेच नाही तर तो १९ वर्षांखालील विश्वचषक इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही ठरला. त्याने केवळ १४ वर्षे आणि २९६ दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आणि अफगाणिस्तानच्या शाहिदुल्लाह कमाल (१५ वर्षे, १९ दिवस) याच्या नावावर असलेला विक्रम मोडला.
बुलवायोच्या मैदानावर बांगलादेशने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. वैभवने विक्रम रचला असला, तरी दुसऱ्या टोकाकडून भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे (६ धावा), वेदांत त्रिवेदी (०) आणि विहान मल्होत्रा (७) स्वस्तात माघारी परतले. वैभव सूर्यवंशीने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी साकारली. भारताला सुपर सिक्समध्ये स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.





