पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे विकृत मनाचे लक्षण – उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/uddhav-devendra.jpg)
शिवस्मारकाच्या उभारणीला होणारा विलंब आणि शिवरायांच्या पुतळयाच्या उंचीवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. ‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला व तो खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण आहे व त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘युनिटी’चे दर्शन झाले पाहिजे असे अग्रलेखात म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवरायांचा पुतळा हा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा भारी व जास्त उंचीचाच व्हायला हवा व त्यासाठी फक्त फडणवीस सरकारने नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी एकत्र यायला हवे असे अग्रलेखात म्हटले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
– जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. हा पुतळा आज अंतराळातून दिसतो त्याचे कौतुक आहे, पण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!