शिवसेना पॅनलला प्रभाग २० मध्ये अनुकूल वातावरण
राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला वेग; विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० (संत तुकाराम नगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, कासारवाडी, नाणेकर चौक) मधील राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवसेना महानगरप्रमुख राजेश चिमणराव वाबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या पॅनलला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन प्रचारात उतरलेल्या या पॅनलकडून नागरी सुविधा, पायाभूत विकासकामे, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा तसेच महिला व युवकांसाठीच्या योजनांवर भर दिला जात आहे. ‘तुमचा विश्वास… आमचा ध्यास… प्रभागाचा सर्वांगीण विकास’ हे ब्रीदवाक्य घेऊन मतदारांशी संवाद साधण्यात येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनहितार्थ योजनांचा लाभ प्रभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २० ला ‘आदर्श प्रभाग’ म्हणून विकसित करण्याचा संकल्पही प्रचारादरम्यान मांडण्यात येत आहे.
हेही वाचा : साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं, पण साहित्यात राजकारण नको; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या प्रभागातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून विनोद नामदेव वाघमारे, वैशाली राजेश वाबळे, स्वीटी निलेश मलातपुरे आणि राजेश चिमणराव वाबळे निवडणूक रिंगणात असून, अनुभवी नेतृत्व, दांडगा जनसंपर्क आणि आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा अनुभव ही या पॅनलची जमेची बाजू मानली जात आहे. विशेषतः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला मतदारांमध्ये शिवसेनेकडे सकारात्मक कल दिसून येत आहे.
दरम्यान, प्रभागातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आणि परिसराच्या शाश्वत विकासासाठी शिवसेनेच्या सर्व अधिकृत उमेदवारांना ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन राजेश वाबळे यांनी केले आहे. येत्या गुरुवारी, १५ जानेवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.




