राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई : महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले.
यावेळी राज्यपाल देवव्रत यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून इतिहास पुढे आणल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले.
अनेक नामांकित छायाचित्रकारांनी वेळोवेळी काढलेल्या लोकभवनातील ऐतिहासिक वास्तूंच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई लोकभवनाशिवाय दिनदर्शिकेमध्ये नागपूर, पुणे व महाबळेश्वर येथील लोकभवनांच्या वास्तूंची देखील आणि मुंबई येथील लोकभवनामध्ये मुक्त संचार असलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – नववर्षात राज्यसभेच्या ‘एवढ्या’ जागा होणार रिक्त; एनडीएसह विरोधकांची लागणार कसोटी
ऐतिहासिक वास्तूंच्या नव्या छायाचित्रांसोबतच संबंधित वास्तूंच्या जुन्या छायाचित्रांचा देखील दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक छायाचित्राला ऐतिहासिक संदर्भ देण्यात आला आहे.
दिनदर्शिकेत सुधारक ओलवे, नवीन भानुशाली, सचिन वैद्य, प्रतिक चोरगे, हनीफ तडवी, संदीप यादव, वैभव नाडगावकर, रमण कुलकर्णी, नागोराव रोडेवाड, आकाश मनसुखानी, सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खंडागळे यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर उपस्थित होते.




