पहलगाम हल्ला, दिल्ली स्फोटाचा अचूक तपास; अमित शहांकडून पोलिसांची प्रशंसा

नवी दिल्ली : “पहलगाम दहशतवादी हल्ला आणि दिल्ली बॉम्बस्फोट ही पोलिसांनी केलेल्या अचूक तपासाची उदाहरणे आहेत,” अशी प्रशंसा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शहा यांनी दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारीवरही भाष्य केले.
दहशतवाद्यांना बैसारन खोऱ्यात दहशतवादी हल्ला करून देशातील धार्मिक सौहार्द बिघडवायचे होते, तसेच काश्मीरमधील विकासाचे नवे पर्व आणि पर्यटन यास लक्ष्य करायचे होते, असे शहा म्हणाले. या संशयित दहशतवाद्यांना यमसदनास धाडल्याबद्दल त्यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४० किलो स्फोटके वापरण्यात आली होती, अशी माहितीही शहांनी दिली.
हेही वाचा – जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच, मुंबईत भाजप १४० तर शिवसेनेला ८७ जागा?
संघटित गुन्ह्यांवर संपूर्ण हल्ला करण्यासाठी आम्ही एक कृती योजना आखत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांनी पोलिसांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या एकसमान एटीएस आराखड्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले. आगामी पिढ्यांसाठी आपण अभेद्य आणि मजबूत दहशतवादविरोधी जाळ्याची निर्मिती केली पाहिजे, ही व्यवस्था कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना तोंड देण्यास सक्षम असेल, असे आवाहन शहा यांनी केले.




