मुंबई : मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. भाजप १४० तर शिवसेना ८७ जागा लढण्याची शक्यता आहे. काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या काही उमेदवारांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या मुंबईतील उमेदवार यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले असून पहिली उमेदवार यादी रविवारी जाहीर होईल आणि उमेदवारांना एबी अर्जांचे वाटप केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांशी शुक्रवारी प्रदीर्घ चर्चा करून भाजपच्या १४० उमेदवारांची यादी निश्चित केली. उत्तर व दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महापालिका प्रभागांमधील उमेदवार शुक्रवारच्या बैठकीत निश्चित झाले आणि गुरुवारच्या बैठकीत अन्य चार लोकसभा क्षेत्रातील उमेदवार ठरविण्यात आले होते. या बैठकीस मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी मंत्री ॲड. आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आदी उपस्थित होते.
भाजप-शिवसेनेतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून शिवसेनेला आणखी काही जागांची अपेक्षा आहे. मात्र भाजप त्यास अनुकूल नसून शिवसेनेला द्यावयाच्या काही जागांवर भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. विधानसभेप्रमाणे तसे झाल्यास शिवसेनेला मिळालेल्या जागांचा आकडा काहीसा वाढेल. पण भाजपने १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविल्याने १४० हून कमी जागा घेण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे शिवसेनेला तडजोड करण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.
हेही वाचा – ‘जिल्हा वार्षिक योजनेची कामे तात्काळ पूर्ण करुन निधी खर्च करा’; ना. शंभूराज देसाई
शिंदे गटाला जागावाटप मान्य नसले तरी भाजपचा प्रस्ताव धुडकावून स्वबळावर लढणे शक्य नाही. शिंदे यांच्या पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आव्हान मोठे असून भाजपबरोबर न राहिल्यास मोठा फटका बसण्याची भीती आहे. भाजपकडून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेवून दिलेला प्रस्ताव स्वीकारणे आणि युतीतच निवडणूक लढणे, एवढाच पर्याय शिंदे गटापुढे आहे. त्यामुळे काही जागांसाठी भाजपकडून आयात उमेदवारांबाबतही विचार सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उमेदवारांना रविवारी एबी अर्ज भाजपची उमेदवार यादी तयार असली तरी ती शनिवारी अधिकृतपणे जाहीर केल्यास उमेदवारी न मिळालेले नाराज होतील व मोठी बंडखोरी होईल. त्यामुळे उमेदवारांना पक्षाच्या एबी अर्जांचे वाटप रविवारी करुन त्याच दिवशी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारपर्यंत मुदत असून शेवटच्या दोन दिवसांत बहुतांश उमेदवार अर्ज दाखल करतील, असे सूत्रांनी नमूद केले.




