गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीच्या दुधाला ३, गायीच्या दुधाला २ रुपये जादा दर!
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; मात्र ग्राहकांना म्हशीच्या दुधासाठी ६ रुपये, तर गायीच्या दुधासाठी ४ रुपये अधिक मोजावे लागणार

कोल्हापूर : गोकुळ दूध संघापाठोपाठ आता वारणा दूध संघानेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वारणा दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, दूध उत्पादकांना दिलासा देतानाच ग्राहकांनाही दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गायीच्या दूध विक्री दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
वाढता पशुखाद्य खर्च, जनावरांचे संगोपन, पशुवैद्यकीय सेवा आणि दूध उत्पादनासाठी येणारा इतर खर्च लक्षात घेऊन दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वारणा दूध संघाने दिली आहे. वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनीही या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे. यासंदर्भात संघाकडून दरवाढीचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, शनिवारपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
दूध उत्पादकांना दिलासा, ग्राहकांच्या खिशावर भार
दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने वारणा दूध संघाने खरेदी दरात वाढ केली आहे. म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३ रुपये आणि गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये अधिक मिळणार आहेत. दुसरीकडे, विक्री दरातही वाढ झाल्याने ग्राहकांना म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ६ रुपये आणि गायीच्या दुधासाठी ४ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
गोकुळ दूध संघानेही केली होती दरवाढ
दरम्यान, यापूर्वी गोकुळ दूध संघानेही दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासकीय काळात संघाला सुमारे २८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले होते. हा तोटा भरून काढण्यासाठी तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे दूध उपलब्धतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन दरवाढ करण्यात आल्याचे गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितले होते.
गोकुळ आणि वारणा या दोन्ही दूध संघांच्या निर्णयांमुळे दूध उत्पादकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी ग्राहकांना वाढीव दराने दूध खरेदी करावे लागणार आहे.




