प्रियदर्शनी स्कूलमध्ये संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धा
शिक्षण विश्व : संविधानाचे भान तरुण पिढीत रुजणे अत्यावश्यक – ॲड. कदाते

पिंपरी-चिंचवड | संविधान दिनानिमित्त प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली संविधान प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रियदर्शनी समूहाच्या विविध शाखांसह एकूण नऊ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. इयत्ता ५ ते १० वीतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, कर्तव्ये तसेच लोकशाहीची रचना याबाबतचे आपले ज्ञान प्रभावीपणे सादर केले.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, नागरिकत्वाची जाणीव आणि लोकशाही जबाबदाऱ्यांविषयीची समज दृढ झाली. ज्ञान आणि चुरशीच्या या स्पर्धेत प्रियदर्शनी स्कूल, शिवाजीनगर शाखेने विजेतेपद पटकावले.
हेही वाचा : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ : सुपर लीग आणि अंतिम सामना पुण्यात रंगणार
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रीम कोर्टातील प्रॅक्टिशनर ॲड. गीताांजली कदाते यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची रूपरेषा, महत्वाचे कायदे आणि नागरिकांच्या भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि पालनाची भावना अधिक दृढ झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध ठरला असून संविधानाबद्दलची जाण वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
“भारतीय संविधान हे फक्त कायद्यांचे पुस्तक नसून आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. तरुण पिढीने त्यातील मूल्ये केवळ शिकणेच नव्हे, तर दैनंदिन आयुष्यात जगणे हेच आजच्या काळाचे खरे नागरिकत्व आहे.”
– अॅड. गीताांजली कदाते, सर्वोच्च न्यायालय.





