महाराष्ट्रातील ३ महत्त्वाचे रस्ते आणि नितीन गडकरींचा अॅक्शन प्लॅन! वाचा काय म्हणाले लोकसभेत…

Nitin Gadkari : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी प्रश्न विचारला. त्यावर नितीन गडकरींनी ही घोषणा केली. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे-कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गाविषयी विचारणा केली असता त्यावरही नितीन गडकरींनी सविस्तर उत्तर दिलं.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील खासदारांनी तीन महत्त्वाच्या मार्गांबाबत काँग्रेस, ठाकरे गट व शरद पवार गटाच्या खासदारांनी प्रश्न विचारले. यामध्ये काँग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रश्न विचारला. त्याचवेळी सुप्रिया सुळेंनी पुणे-कोल्हापूर मार्गाबाबत तर अरविंद सावंत यांनी बहुचर्तित आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाबाबत विचारणा केली. या तीनही मार्गांबाबत नितीन गडकरींनी यावेळी उत्तर दिलं.
गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? असा प्रश्न मुंबई ते गोवा या पट्ट्यात राहणाऱ्या प्रत्येक कोकणवासीयाला पडला आहे. हाच प्रश्न अरविंद सावंत यांनी लोकसभेत विचारला असता नितीन गडकरींनी त्यावर काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत सांगितली. “हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागच्या सरकारच्या काळात रस्त्याचं काम सुरू झालं. अनेक कंत्राटदार बदलले गेले. जमीन अधिग्रहणाचीही समस्या होती. पण आत्तापर्यंत ८९.२९ टक्केकाम पूर्ण झालं आहे. एप्रिल २०२६ च्या आत हा रस्ता पूर्ण केला जाईल. यात कोणतीही दिरंगाई होणार नाही”, असा शब्द नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना दिला.
हेही वाचा – जयाद्री खोऱ्यात सहावा आंतरराष्ट्रीय उलूक उत्सवाची धडाक्यात सुरुवात
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच पुणे-कोल्हापूर मार्गाचं कामदेखील प्रलंबित असून त्याबाबत सुप्रिया सुळेंनी विचारलेल्या प्रश्नावर नितीन गडकरींनी उत्तर दिलं. “पुणे ते सातारा या रस्त्याचं काम रिलायन्सकडे होतं. आता ते रद्द करून या कामाचा पुन्हा आमचा विभाग आढावा घेत आहे. पुण्यातील बायपासच्या सर्व्हिस लेनचं कामही विभागातर्फे सुरू करण्यात आलं आहे. खंबाटकी घाटातल्या नव्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा लवकरच सुरू करण्यात येईल. साताऱ्याच्या पुढे कोल्हापूरपर्यंतच्या कामात काही अडचणी आहेत. त्यावर माझी पुढच्या आठवड्यात बैठक आहे. वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केलं जाईल”, असं ते म्हणाले.
काँग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव मार्गाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यावर गडकरींनी उत्तर दिलं. “हा प्रकल्प २०१० ला बीओटीमध्ये पूर्ण झाला. पहिलं नुतनीकरण २०१६ साली एक वर्षं उशीराने झालं. त्यावर कंत्राटदाराला १६ कोटी दंड आकारण्यात आला. दुसरं नुतनीकरण २०२१ साली पुन्हा एक वर्षं उशीराने झालं. त्यावर ७ कोटी दंड आकारण्यात आला. तिसरं नुतनीकरण सध्या चालू आहे. जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. शेवटची मुदत एप्रिल २०२६ आहे. आता धुळे ते पिंपळगाव चौपदरी रस्ता असून तो सहा पदरी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. लवकरच त्याचं कंत्राट काढून काम सुरू केलं जाईल”, अस नितीन गडकरींनी नमूद केलं.





