जेजुरीत लोकशाहीचा उत्सव; 78 टक्के मतदान!
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: शांतता आणि खेळीमिळीत मतदानाचा हक्क बजावला

पुरंदर : राज्यभरातील काही नगरपालिका निवडणुका मंगळवारी पार पडल्या, तर काही निवडणुका न्यायालयीन आदेशानुसार पुढे ढकलल्या गेल्या. मात्र खंडोबाची जेजुरीमध्ये नागरिकांनी आपले लोकशाहीचे कर्तव्य उत्साहात पार पाडले आणि 78 टक्के मतदान करून निवडणुकीला यशस्वी बनवले.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप बारभाई, शिवसेना (शिंदे गट) चे विठ्ठल सोनवणे, तसेच भाजपाचे सचिन सोनवणे यांनी उमेदवारी नोंदवली. नगरसेवक पदासाठी प्रत्येकी वीस उमेदवार मैदानात होते.
जेजुरी ही केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र नसून सांस्कृतिक गाव म्हणूनही ओळखली जाते. वर्षभर येथे आठ प्रमुख यात्रा भरतात आणि दररोज पर्यटक ये-जा करतात. स्थानिक राजकीय वातावरण शांत आणि खेळीमिळीत राहते; निवडणूक काळातही वाद, राग- द्वेष टाळत, केवळ सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळाले.
या वर्षी विशेष म्हणजे, जेजुरी विकासासाठी विरोधक गट एकजुटीने मैदानात उतरत होते. मुलभूत सुविधा अद्याप पूर्ण नसल्या तरी, नागरिकांना ही निवडणूक जेजुरीची घडी बसविण्याची संधी म्हणून पाहिली गेली.
हेही वाचा – कृषी कायद्यातील बदलांसाठी राज्यातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला राज्यव्यापी बंद…

निवडणूक दिवशी मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आदर्श मतदान केंद्र उभारले गेले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रांगणातील छत्री मंदिराजवळील जिजामाता शाळा येथे गुलाबी रंगाचे गेट आणि फुगे लावून सजावट केली होती. नव्या आरोग्यवर्धिनीच्या इमारतीची देखील रंगतदार सजावट करण्यात आली होती.
मतदानाच्या दिवशी विरोधी व सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्र येऊन लोकशाहीचा उत्सव साजरा करत होते. वर्ण, जाती किंवा राजकीय भेदभाव न करता, नागरिकांनी निवडणुकीला खेळीमिळीत वातावरण दिले, ज्याचे कौतुक पोलीस, निवडणूक अधिकारी आणि पर्यटकांनीही केले. जेजुरीतील ही निवडणूक लोकशाहीच्या उत्सवाचे उदाहरण ठरली, जिथे मतदारांनी शांतता, संघटन आणि जबाबदारीने मतदान केले.
जेजुरीतील आदर्श मतदान केंद्र….
जेजुरीच्या मध्यभागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रांगणाजवळील छत्री मंदिरासमोर असलेल्या जिजामाता शाळेतील मतदान केंद्र या वर्षी आदर्श ठरले. येथे सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच गुलाबी रंगाचे गेट आणि फुगे लावून केंद्र सजवले गेले. याशिवाय, नगरपालिका लगत असलेली नव्या आरोग्यवर्धिनीची इमारतही रंगतदार सजवली होती. या व्यवस्थेमुळे मतदान केंद्रावर सर्व पक्षांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ एकत्र येऊन शांततेत लोकशाहीचा उत्सव साजरा करत होते, हे खास वैशिष्ट्य ठरले.





