भक्ती शक्ती उड्डाणपूल परिसरातील खड्ड्यांमुळे अपघात
मेट्रो अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
निगडी : पिंपरी परिसरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषतः भक्ती शक्ती उड्डाणपूलाखालील श्रीकृष्ण मंदिर ते अंकुश चौक या मार्गावर गेल्या सहा महिन्यांपासून मोठे खड्डे असून रस्ता प्रचंड धोकादायक बनला आहे. या ठिकाणी अलीकडेच एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यात पडून गंभीर अपघात झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या प्रकरणात पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रो कामासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत, परंतु सुरक्षा रक्षक तैनात केलेले नाहीत, दिशादर्शक फलक लावलेले नाहीत, आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
काळभोर यांनी सांगितले की, “श्रीकृष्ण मंदिर ते अंकुश चौक हा मार्ग सहा महिन्यांपासून बंद आहे. पर्यायी रस्ता नसताना नागरिकांना धोकादायक खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. अनेक वेगवेगळ्या तक्रारी देऊनही पुणे मेट्रो अधिकारी कुठलीही दखल घेत नाहीत. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.”
हेही वाचा – ‘पालिका क्षेत्रातील विकासासाठी सरकारच्या मोठ्या योजना’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील कामामुळे मुंबई–पुणे महामार्ग आणि आजूबाजूच्या भागातील रस्त्यांवर असंख्य खड्डे तयार झाले असून गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. तरी देखील ठेकेदार आणि प्रकल्प अधिकारी आवश्यक दुरुस्ती किंवा खबरदारी घेत नसल्याचे आरोप स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत आहेत.
काळभोर पुढे म्हणाले, “राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणे दडपली जात आहेत. वारंवार अपघात होत असूनही मेट्रो प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. नागरिकांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.”
या सर्व प्रकरणाची दखल घेऊन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डे बुजवणे, योग्य सुरक्षा रक्षक तैनात करणे आणि स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनीही याबाबत आवाज उठवला असून, “मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे; पण नागरिकांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासनातर्फे काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




