महापालिकेने मुलुंड येथे कबुतरखान्यासाठी जागा निश्चित
महापालिकेच्या निर्णयाविरोधात नागरिकांची निदर्शने
मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार लक्षात घेऊन शहरातील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही, महापालिकेने ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसरात कबुतरखान्यासाठी जागा निश्चित केली आहे; मात्र या निर्णयाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध केला असून ‘मुलुंडमध्ये कबुतरखाना नकोच’ असा नारा देत गुरुवारी (ता. ६) सायंकाळी मुलुंड पूर्व रेल्वे परिसरात नागरिकांनी निदर्शने केली.
ऐरोली-मुलुंड लिंक रोड हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा अत्यंत व्यस्त मार्ग असून येथे कबुतरांना दाणे टाकण्याची परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात पक्षी गोळा होतील. त्यामुळे अचानक उड्डाण करणाऱ्या कबुतरांमुळे वाहतूक अडथळे निर्माण होण्याची आणि विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता स्थानिकांनी या वेळी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – कृषी समृद्धी योजनेला राज्य सरकारची मंजुरी; शेतकऱ्यांसाठी ड्रोन, शेततळे व बीबीएफ यंत्रास अनुदान
‘कबुतरखान्यामुळे केवळ वाहतूक धोक्यात येणार नाही, तर परिसरातील ‘क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य’वरही परिणाम होऊ शकतो. राज्य सरकारने २०१५ मध्ये सुमारे १७ चौरस किलोमीटर क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केले असून, येथे दरवर्षी २००हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचा वावर असतो.’ असेही सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी या वेळी सांगितले.
महापालिकेने मुलुंडकरांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले आणि या जागेवर कबुतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू, तसेच या निर्णयाविरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहोत.
– ॲड. सागर देवरे, सामाजिक कार्यकर्ते





