पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांना म्हटले Happy Diwali!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Pankja-and-Dhananjay.jpg)
दिवाळीचा सण हा प्रत्येकासाठी खास असतो. खरेदी, दिव्यांची आरास, फराळ, आकाशकंदील, फटाक्यांची आतषबाजी हे सारं काही दिवाळीत अनुभवयाला मिळतं. राजकीय नेतेही दिवाळी आनंदातच साजरी करतात. दिवाळीची धूम राज्य आणि देशभरात सुरु असताना परळीत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समोरासमोर आले. यावेळी दोघांनी एकमेकांना Happy Diwali म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
बीडच्या व्यापारी पेठांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापाऱ्यांची गडबड सुरु होती. चोपडी पूजन असल्याने व्यापारी पेठा लोकांच्या गर्दीने आणि उत्साहाने भरुन गेल्या होत्या. पालकमंत्री पंकजा मुंडे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जेव्हा व्यापारी पेठांमध्ये आल्या त्याचवेळी धनंजय मुंडेही शुभेच्छा द्यायला व्यापारी पेठांमध्ये आले होते. एका दुकानात अचानक या बहिण भावांची गाठ पडली. या दोघांसोबत जे कार्यकर्ते होते ते काही क्षण बुचकळ्यात पडले. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांकडे पाहून हसतमुख चेहऱ्याने एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांच्याशीही हस्तांदोलन केले आणि त्यांनाही शुभेच्छा दिल्या. परळीकरांसाठी हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याने पंकजा मुंडे आणि त्यांच्यातले मतभेद महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. अशात दिवाळीच्या निमित्ताने या दोघांनी मतभेद विसरून काही क्षणांसाठी एकत्र येत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. एरवी राजकारणात हे दोघेही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. बहिण-भाऊ असूनही या दोघांमधून विस्तव जात नाही का? असा प्रश्न महाराष्ट्राला पडतो. मात्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तो प्रसंग बीडमध्ये चांगल्याच चर्चेचा विषय ठरला.