कफ सिरपमुळे बालकांचे मृत्यू; आता महाराष्ट्रात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध मिळणार नाही

देशातील विविध राज्यांमध्ये खोकल्याच्या सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत मृतांचा आकडा 20 वर पोहोचला असून नुकताच नागपूरमध्ये उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या सर्व बालकांचा मृत्यू कोल्ड्रिफ सिरपच्या सेवनामुळे झाल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे.
महाराष्ट्राच्या एफडीएने राज्यातील सर्व औषध विक्रेत्यांना आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाची विक्री करू नका असे तात्काळ आदेश दिले आहेत. या बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ सिरपमध्ये डायइथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र FDA विभागाने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांमध्ये तपासणी मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा : महावितरण कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू; सरकारची कडक भूमिका, मेस्मा लागू
विषारी कफ सिरपचा साठा जिथे आढळेल तो त्वरित गोठवावा आणि नष्ट करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील अधिकारी तामिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत. ऑल फूड ड्रग व लायसन्स होल्डरम फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील अनेक औषध विक्रेत्यांकडून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांची सर्रास विक्री होत असल्याचा दावा केला आहे.
एफडीएच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान बालकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ सिरपच्या तामिळनाडूमधील कारखान्यावर मध्यप्रदेशच्या एसआयटीने छापेमारी करून तो कारखाना सील केला आहे तसेच तेलंगणा प्रशासनानेही गुजरातमध्ये उत्पादित होणाऱ्या रिलीफ व रेस्पिफ्रेश या दोन कफ सिरपच्या वापरावर बंदी घातली आहे.




