मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर समीर भुजबळांकडून येवल्यात मदतीचा दिलासा
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार!
येवला : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी चिंता करू नये, आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिले. अंदरसूल येथे कोळगंगा नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हुडको कॉलनी परिसरात नाल्याशेजारील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे झालेल्या समस्यांवर लवकर उपाययोजना करू, असेही ते म्हणाले. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा करून सूचना दिल्या.
भुजबळ पुढे म्हणाले की, मतदारसंघाचे भाग्यविधाते मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार पंचनामे सुरू आहेत. हे काम वेगवान करण्यास सांगितले असून, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिले आहे. रस्त्यांचे प्रश्नही लक्षात घेऊन लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेऊ, असे ते म्हणाले. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, दत्ता निकम, किसन धनगे, सचिन कळमकर, मच्छिंद्र थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
विकासकामांचे लोकार्पण
दरम्यान, भुजबळ यांच्या हस्ते नुकत्याच मंजूर झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. वळदगाव येथील महानुभाव मंदिराजवळील सभामंडप बांधकाम, शिरसगाव लौकी येथील अभ्यासिका, तसेच हुडको कॉलनी शॉपिंग सेंटरमागील गटार बांधकाम व रस्ता काँक्रिटीकरण यांचा समावेश होता. या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, उपाध्यक्ष दत्ता निकम, भोलाशेठ लोणारी, दीपक लोणारी, मोहन शेलार, डॉ. प्रवीण बुल्हे, राजेंद्र लोणारी, बाळासाहेब बुल्हे, अशोक लोणारी, जयदेव कानडे, भाऊलाल आजगे, भाऊसाहेब धनवटे, पार्थ कासार, विशाल परदेशी, आदित्य कानडे, श्रीकांत वाकचौरे, वाल्मीक कुमावत, सौरभ जगताप आदी उपस्थित होते.





