‘गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटी रुपये कमावतोय’; अंजली दमानिया यांचा नितीन गडकरींवर निशाणा

मुंबई | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र निखिल गडकरी यांच्या मालकीच्या सियान अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत गेल्या दीड महिन्यात जवळपास चौपट वाढ झाली आहे. या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दमानिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत गडकरी यांच्या “माझ्या बुद्धीचं मूल्य दरमहा २०० कोटी रुपये आहे” या वक्तव्याचा संदर्भ देत चिमटा काढला आहे.
अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत. ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखलं आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत.
हेही वाचा : पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर; उपमुख्यमंत्री अजित पवार
आपल्याला माहिती आहे की त्यांच्या मुलाची सियान अॅग्रो नावाची कंपनी आहे. २५ जून रोजी सियान अॅग्रोमध्ये १,८९,३८,१२१ प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते. या शेअरच्या किमतीत आज ७६ रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका दिवसात १४३.९२ कोटी रुपये त्यांनी कमावले. निखील व सारंग गडकरी दिवसाला इतके पैसे कमावत आहेत, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.





