ग्राऊंड रिपोर्ट: दिघी-बोपखेलमध्ये भाजपा-राष्ट्रवादीतच ‘‘खेला होबे’’
मिशन महापालिका निवडणूक: प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपा-राष्ट्रवादी- शिवसेना लढत
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वबळावर लढवतील, असे चित्र आहे. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत. ( दिघी-बोपखेल )
2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 55 हजार 539 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 797 इतकी अनुसूचित जाती आणि 4 हजार 286 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये या प्रभागामध्ये भाजपाची मोठी लाट होती. या प्रभागातून भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले होते. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. भाजपाच्या उपमहापौर हिरानानी घुले आणि सरचिटणीस विकास डोळस या प्रभागातून प्रतिनिधीत्व करतात. माजी सैनिक स्व. लक्ष्मण उंडे येथून निवडून आले होते.
गत निवडणुकीत अ-गटातून विकास डोळस यांनी 12 हजार 63 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या वसंत इंगळे यांचा पराभव केला होता. ब- स्व. लक्ष्मण उंडे यांनी 11 हजार 690 मते मिळवत, बाळू लांडे यांचा पराभव केला होता. क- गटातून हिरानानी घुले यांनी 13 हजार 299 अशी सर्वाधिक मते मिळवली होती. त्यांनी वृषाली घुले-झुपके यांचा, तर ड- गटातून निर्मला गायकवाड यांनी 12 हजार 263 मते मिळवत कल्पना वाळके यांचा पराभव केला आहे.
भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक विकास डोळस आणि हिरानानी घुले यांच्यावर प्रभागाची मदार आहे. विशेष म्हणजे, गायकवाड कुटुंबीयांचा प्रभागात प्रभाव राहणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चंद्रकांत वाळके निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
2017 च्या आरक्षणानुसार, अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50 टक्के आरक्षण आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणामध्ये काही फार बदल होईल, असे चित्र नाही
आमदार महेश लांडगे यांची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जोरावर प्रभागातील चारही जागा भाजपा विजयी करेल. नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड चांगले आहे. बोपखेल पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्ते आणि पाणी पुरवठा सक्षम झाला आहे. विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून भाजपाला सुमारे 6 हजार 500 मतांचे लीड मिळाले होते. त्याची पुनरावृत्ती आता महापालिका निवडणुकीत होईल.
– विकास डोळस, भाजपा.
गेल्या आठ वर्षांमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न सत्ताधारी नगरसेवकांना सोडवता आला नाही. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. 24 तास पाणी पुरवठा बाबत दिलेले आश्वासन पाळले नाही. कोणताही डीपी रस्ता किंवा अंतर्गत रस्ते पूर्ण केले नाहीत. रस्त्यांची चाळण झाली आहे. वीज पुरवठा सक्षम नाही. तीन-चार तास परिसर अंधारात लोडशेडिंगमध्ये असतो. याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
– चंद्रकांत वाळके, राष्ट्रवादी अ.प.







