मराठा आरक्षण मोर्चा: मुंबई HC च्या आदेशानंतर CSMT परिसरातून आंदोलकांची वाहनं हटवण्यास सुरुवात
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलक हटवले जात असले तरी आंदोलन सुरूच ठेवण्यावर आंदोलक ठाम
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून दक्षिण मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं होतं. CSMT परिसरात आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी हस्तक्षेप करत, CSMT परिसर मोकळा करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर प्रशासनाने तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे.
मराठा मोर्चा न्यायालयाचा स्पष्ट आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत, आझाद मैदान वगळता सीएसएमटी, मरीन ड्राइव्ह, फ्लोरा फाउंटन यांसह दक्षिण मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते आंदोलकांच्या वाहनांपासून मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुढील सुनावणी मंगळवारी (3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता होणार आहे.
पोलिस आणि पालिकेची संयुक्त कारवाई मराठा
कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना, मुंबई पोलिस आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी CSMT परिसरात वाहन हटवण्याचे काम सुरू केले आहे. आंदोलकांचे काही ट्रक आणि खासगी गाड्या वाशीच्या दिशेने पार्किंगसाठी हलवण्यात येत आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परिसराची साफसफाई व सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. रात्रभर हे काम सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी, “गाड्या आम्ही हटवतो, पण आंदोलन सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका घेतली आहे. सोमवारी रात्री आंदोलक समन्वयकांनी आवाहन करत, तातडीने वाहनं हटवण्यास सांगितलं. मात्र काही गाड्या अद्याप परिसरात ठिय्या मांडून आहेत.
सीएसएमटी परिसरात सध्या काय परिस्थिती?
-
वाहन हटवण्याचं काम सुरू
-
महानगरपालिकेची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण मोहीम
-
पोलीस बंदोबस्त वाढवला
-
स्पीकरवरून सूचना देण्याचं सत्र सुरू
-
वाहतूक कोंडी कमी होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येईल. काही व्यक्तींमुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे.” तसेच, सरकारकडून मराठा आरक्षणावर नवीन GR तयार करण्याचे काम सुरू असून, त्याचा अंतिम मसुदा मनोज जरांगेंना दाखवण्यात येणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.
आंदोलन मागचं कारण काय?
मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये OBC प्रवर्गातून 10% आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हे मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी सक्रीय आहेत.





