..तर तुमच्या *&^#नांगराचा फाळ घालीन; सदाभाऊ खोत यांचे गोरक्षकांवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Sadabhau Khot | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांवर जाहीर टीका करताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सांगोला येथे आयोजित एका सभेत बोलताना खोत यांनी धमक्या देणाऱ्या गोरक्षकांना थेट इशारा देताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. “माझ्या नादी लागू नका. मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे. तो नांगराचा फाळ तुमच्या *&#%मध्ये घालीन,” असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सांगोला येथे महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी जनावरे घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवणाऱ्या गोरक्षकांविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चात बोलताना ते म्हणाले की, “माझ्या नादाला लागून अनेक जण भेंडाळले आहेत, तुम्ही पण तसेच व्हाल. काही लोकं गायी अडवतात, याला विरोध केल्यावर मला धमकीचे फोन आले. शेतकऱ्याने कधीही खिलार किंवा देशी गायी बाजारात विकायला आणलेली नाही. हा हजारो वर्षांचा इतिहास आहे. कधी आपण देशी गाई बाजारात घेऊन आलो का? कधी खिलार गाय बाजारात आणली का? खिलार किंवा देशी गाईची कधीच विक्री होत नाही. अरे धमक्या कोणाला देता, शेतकऱ्यांच्या पोराला? मी नांगराचा फाळ आणलाय. तुम्ही जर माझ्या वाटेला गेला, तर तुमच्या *&^#नांगराचा फाळ घातल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा,” असा इशारा खोत यांनी दिला आहे.
हेही वाचा : आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत TDIA बैठकीत उद्योगनगरीच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय
गोरक्षकांकडून घेण्यात येणाऱ्या आक्रमक भूमिकेला विरोध करत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली होती. “सरकारने आणलेला गोवंश हत्या बंदी कायदा हा आता गोपालक हत्या बंदी कायदा झाला आहे. कारण आज शेतकऱ्यांसमोर भाकड गायी, होस्टाईल झालेल्या गायी, कमी दूध देणाऱ्या जर्सी गायी, जर्सी गायींचा गोऱ्हा यांचे काय करायचं, हा मोठा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांकडे दोन जनावरे जर असतील त्यांच्यामध्ये एक जर भाकड निघालं तर शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही. जर्सी गायीला गोऱ्हा झाला तरी तो औतालाही चालत नाही. त्यामुळे एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करत आहेत आणि त्याच्यावर एकदोन अनुत्पादक जनावर जर भार म्हणून पडलं तर तो धंदा तोट्याचा होत आहे. गोरक्षक हे जनावर बाहेर विकायचे म्हटले तर रस्तोरस्ती अडवत आहेत, खंडणी बहाद्दर बनून खंडण्या गोळा करत आहेत. या फटका गावगाड्याच्या शेतकऱ्याला बसत आहे. पूर्वी भाकड जनावरे विकल्यावर शेतकऱ्यांना 20-25 हजार रुपये मिळायचे. त्याच्यात आणखी 20-25 हजार रुपये घातले तर नवीन जनावर विकत घेता येत होतं. परंतु आता या गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडला आहे. हे गोरक्षक आता गोभक्षक झाले असल्याने आता शेतकऱ्याला लढा दिल्याशिवाय पर्याय नाही,” असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला होता.





