“कृष्ण विरुद्ध सुदर्शन: उपराष्ट्रपतीपदाची दक्षिणात्य लढत”
दक्षिण भारतातून उमेदवारांची लढत; एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीची चुरस तीव्र

नवी दिल्ली | 2025 ची उपराष्ट्रपती निवडणूक एक अनोखी लढत घेऊन आली आहे. दोन्ही राष्ट्रीय आघाड्यांनी – एनडीए आणि इंडिया आघाडी – आपापल्या उमेदवारांची घोषणा केली असून, ही लढत दक्षिण भारतातील दोन प्रमुख व्यक्तिमत्त्वांमध्ये रंगणार आहे. एनडीएने महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि भाजप नेते सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूतील कोइम्बतूरचे रहिवासी असलेले राधाकृष्णन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी संघटनात्मक आणि प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव घेतलेला आहे. नामांकन दाखल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 160 खासदार उपस्थित होते. मोदींनी राधाकृष्णन यांना एकमताने पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
इंडिया आघाडीची गुगली – बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी
इंडिया आघाडीकडून माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मूळ रहिवासी असलेले रेड्डी हे न्यायपालिका आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात प्रतिष्ठित नाव मानले जाते. द्रमुक प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करत ही निवड लोकतांत्रिक मूल्यांना बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावली; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
राजकीय समीकरणे आणि दबावाचे डावपेच
या निवडणुकीने दक्षिण भारतातील प्रादेशिक पक्षांपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षावर दबाव असताना, त्यांचे पुत्र नारा लोकेश यांनी स्पष्ट पाठिंबा जाहीर केला आहे की एनडीए एकजूट आहे आणि राधाकृष्णन यांना त्यांचा ठाम पाठिंबा आहे. याउलट, सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीमुळे वायएसआर काँग्रेस, बीआरएससारख्या पक्षांची कोंडी झाली आहे. हे पक्ष कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
उपराष्ट्रपती निवडणूक का होत आहे?
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिला. भारतीय संविधानाच्या कलम 68(2) नुसार, पद रिक्त झाल्यास शक्य तितक्या लवकर निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. एनडीएकडे एकूण 425 मतदार (लोकसभा 293 + राज्यसभा 129) आणि इंडिया आघाडीकडे एकूण 312 मतदार आहेत. वायएसआरसीपी, बीजेडी यांच्यासारखे पक्ष एनडीएला झुकाव दाखवू शकतात, त्यामुळे संख्याबळाच्या गणनेत एनडीए आघाडीवर आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फक्त आकडेवारी नव्हे, तर राजकीय खेळी, प्रदेशीय गणितं आणि नैतिक प्रतिमा यांचा संगम पहायला मिळत आहे. 9 सप्टेंबर रोजी ही चुरशीची लढत कोण जिंकेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.





