धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घटना घडल्याने हळहळ
पिंपरी: निगडी, प्राधिकरण परिसरातील एका बीएसएनएलच्या ‘इन्स्पेक्शन चेंबर’मध्ये (निरीक्षण कक्ष) काम करताना गुदमरून ३ कंत्राटी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना सेक्टर २७ मधील प्लॉट नंबर ६५ समोर, रस्त्याच्या कडेला घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिनही कामगार ऑप्टिकल फायबरच्या कामासाठी चेंबरमध्ये उतरले होते. मयत कामगारांची नावे दत्ता होलारे, लखन धावरे (दोघेही सध्या राहणार गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि साहेबराव गिरसेप (रा. बिजलीनगर) अशी आहेत. हे तिघेही बीएसएनएलच्या आकुर्डी कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने काम करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कामगार रस्त्यावरील एका निरीक्षण कक्षात (inspection chamber) काम करण्यासाठी उतरले होते. मात्र, चेंबरमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने किंवा विषारी वायूमुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.





