शिक्षण विश्व: अग्निशामक दलात सायबर जनजागृती मोहीम उत्साहात
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ उपक्रमांतर्गत डिजिटल सुरक्षा विषयक मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड | सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने प्रतीभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत अग्निशामक दलासाठी विशेष जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. ही मोहीम उत्साहात पार पडली.
प्राधिकरण येथील अग्निशामक दलाच्या कार्यालयात आयोजित या अभियानात, अधिकाऱ्यांना पासवर्ड व्यवस्थापन, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फिशिंग व व्हॉट्सअॅप फसवणूक ओळखणे आणि टाळणे, तसेच बँक व सरकारी फसवणुकीबाबत जागरुक राहण्याचे उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रात्यक्षिके व व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये डिजिटल जागरूकता वाढवण्यात आली.
हेही वाचा : गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे; उपमुख्यमंत्री अजित पवार
या उपक्रमात कॉलेजमधील गायत्री गुंजालोर, फैसल इस्लाम, रोनित चौधरी आणि दुर्वा साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. उपस्थित अधिकाऱ्यांनी या माहितीचा सकारात्मक प्रतिसाद देत, सायबर सुरक्षेबाबत नव्याने जागरुक होण्याची तयारी दर्शवली. या यशस्वी उपक्रमामागे डॉ. दीपक शहा यांचे मार्गदर्शन, डॉ. भूपाली शहा, डॉ. तेजल शहा यांचे सहकार्य व प्रकल्प समन्वयिका डॉ. हर्षिता वाच्छानी यांचे प्रभावी संयोजन होते. तसेच श्रावणी सावंत (अध्यक्षा), आकाश ठाकूर (सचिव), ऑलिव वर्गीस (संचालक), मानसी वाडेकर (मीडिया डायरेक्टर) यांचा मोलाचा वाटा होता. क्विक हिल सीएसआर प्रतिनिधी म्हणून अजय शिर्के, गायत्री केसकर आणि दीपू सिंह यांनी मार्गदर्शन केले.
मोहीमेचा सकारात्मक परिणाम…
या मोहिमेमुळे अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबतची जाणीव अधिक बळकट झाली असून, सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याची सवय जोपासली जाणार आहे. हा उपक्रम सर्वच स्तरांवरून यशस्वी व प्रेरणादायक ठरला आहे.




