ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

काँग्रेसची वाटचाल जीवघेण्या अहंकाराकडून आत्मघाताकडे !

काँग्रेस पक्ष कसा भारी आणि मोदी सरकार कसे काळात निघाले आहे हे सतत दाखवण्याचा प्रयत्न देशातील मीडियाचा सुरू असतो. एकदोन यूट्यूब वाहिन्यांवर काँग्रेस पक्षाच्या संदर्भात भलतीच आशावादी आणि आशादायक अशी परिस्थिती असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. मोदी सरकार तिसऱ्या वेळी सत्तेवर येऊन एक वर्ष होऊन गेले आहे. पसंत नसलेल्या एखाद्या नवदांपत्याचा संसार मोडण्याची वाट बघत बसणाऱ्या ‘बोटेमोडू’ माणसांप्रमाणे काँग्रेस पक्षाची अवस्था झाली असून संसार काही मोडत नाही आणि कोणताही चांगला मुद्दा हातात येत नाही, ही काँग्रेस प्रमाणेच त्यांच्या चाहत्यांची अवस्था झाली आहे.

फक्त आंदोलने आणि टीकास्त्र..

सध्या या पक्षाची देशातील अवस्था बघा. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व चांगलेच अडचणीत आले आहे. राजकीय पक्षांनी केवळ आंदोलन केले आणि सरकारवर शक्य असेल तेव्हा सतत टीका केली म्हणजे आपली सत्ता परत येण्याचा मार्ग मोकळा झाला असे होत नाही ना. काँग्रेसच्या नेत्यांना हे कळायला हरकत नाही. पण, ते अहंकारामध्ये मशगुल असून त्यांची वाटचाल आत्मघाताकडे सुरू आहे, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल.

हिमालयात जाण्याचा विचार..

१९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव करुन जनता पक्ष सत्ताधारी झाला, तेव्हा इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय यांनी हिमालयात एखाद्या गावात जाऊन झोपडी बांधून राहण्याचा विचार सुरु केला होता. पण, जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि बिहारमधील एका घटनेने त्यांना सत्तेकडे परतीची वाट दाखवली होती. जनता पक्षात सगळे नेते मोठे होते, पण सगळे पिकलेले आंबे कोणी एका वेळी खरेदी करीत नाही. त्या वेळी इंदिरा गांधी यांना नशिबाने आणि जनता पक्षातील फुटीर नेत्यांनी साथ दिली, म्हणून त्या परत सत्ताधारी झाल्या होत्या. पण, जबरदस्त बहुमत असूनही वर्षभरात इंदिरा गांधी यांची प्रशासन आणि पक्षावर असलेली पकड सैल झाली होती. त्यातच संजय गांधी यांचे अपघाती निधन झाल्याने त्या खचून गेल्या होत्या. पुढे इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४०४ आणि नंतर १० अशा ४१४ जागा मिळूनही राजीव गांधी यांची पक्ष आणि सरकारवर असलेली पकड सैल झाली होती आणि त्यांचेच अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी काँग्रेस पक्षाला दणका दिला होता, हा इतिहास देखील अगदी ताजाच म्हणावा लागेल !

हेही वाचा     :      कर संकलन विभागाची ऑनलाईन सेवा नागरिकांसाठी ठरतेय उपयुक्त!

गेलेली सत्ता परत आली..

१९९६ मध्ये काँग्रेसने गमावलेली सत्ता २००४ मध्ये परत आली, ती आघाडी सरकारच्या स्वरुपात. ती २००९ मध्ये टिकून राहिली, ती भाजपची तयारी नसल्यामुळे आणि भाजपच्या फाजील आत्मविश्वासामुळे! २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाने अगोदरच हार मानली होती, पाच वर्षे विरोधक सत्ताधारी झाले, तरी २०१९ मध्ये आपणच आहोत, या भ्रमात काँग्रेसचे नेते होते. मग २०२४ मध्ये कथित ‘इंडी’ आघाडी झाली. पण तीही फारशी प्रभावी ठरली नाही. याचे कारण म्हणजे काँग्रेस नेतृत्वाची क्षमता, वकूब, कर्तव्यतत्परता आणि विश्वासार्हता !

राहुल गांधी यांचा खळखळाट..

चला तर, आता मूळ मुद्द्यावर येऊ. तीन- चार दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना घरी भोजनासाठी बोलावले आणि त्यांना मतदानाच्या संदर्भात बरेच नकाशे वगैरे दाखवले. निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या नावाने थयथयाट आणि खळखळाट केला. नंतर भोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे आणि रसमलाई चांगली असल्याचे कळल्यामुळे कदाचित संजय राऊत वगैरे कंपनी शेवटच्या ओळीत का होईना, पण सगळे ऐकत थांबली असावीत. पण, सर्व विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांना सर्वमान्य नेता म्हणून औपचारिक काय, पण अनौपचारिकपणे देखील मान्य केलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

काँग्रेसचा बाजार उठत चालला..

भारतीय राजकारणात सत्ताधारी पक्षाला मिळणारे मतदान ४० ते ४५ टक्के एवढेच असते. म्हणजे उर्वरित मते विरोधात असतात. ही सगळी एकत्र झाली तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होऊ शकतो. पण, आपल्याकडे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आणि ते राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला आपल्या राज्यात शिरु देण्याच्या विरोधात असतात. भाजपने हळूहळू काही प्रादेशिक पक्ष गुंडाळत आणले आहेत. पण, काँग्रेस पक्षाला ते शक्य झालेले नाही. केवळ गांधी-नेहरू घराण्याचा अभिमान आणि राहुल गांधी यांची प्रचंड कर्तृत्ववान नेता अशी ‘इमेज’ करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचा देशात बाजार उठत चालला आहे.

पुण्याई संपत चालली…

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची वाटचाल आत्मघाताकडे सुरु आहे, हे विधान धाडसाने करावे असेच आहे. मुख्य प्रश्न आहे तो गांधी घराण्याचा ! आपल्याला एखादे हाँटेल आवडते, पण गल्ल्यावर बसलेला खडूस म्हातारा आवडत नाही. म्हणून, आपण जाण्याचे टाळतो, तसे गांधी घराणे हे काँग्रेसच्या भावी वाटचालीत मोठा अडथळा आहे. मते मिळविण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता गांधी घराण्याकडे फारशी उरलेली नाही. दोन भावंडे या दोन तोफा (?) मानल्या, तरी त्यातील नेमकी कोणती तोफ योग्य वेळी धमाका करु शकेल, याची खात्री नाही आणि महत्त्वाचे म्हणजे २००४ मध्ये अवघ्या १४६ जागा मिळूनही काँग्रेसचे सरकार केंद्रात आले, त्याला मुख्य कारण म्हणजे डाव्या पक्षांचा पाठिंबा आणि चार, पाच प्रादेशिक नेते. शिवाय त्या वेळी आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान करण्यात आले, हा मोठा फायदा होता.

राहुल गांधींची अवस्था काय?

आज काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या, तर राहुल गांधी यांना विरोधी पक्ष आपला नेता मानून पंतप्रधान करायला तयार होणार आहेत का ? म्हणजे नेतृत्व हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे देशातील एकंदर परिस्थिती पाहता काँग्रेस पक्ष शंभर जागा पार करु शकेल, अशी परिस्थिती आज तरी नाही. राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी असूनही राहुल गांधी यांना फार मोठा प्रभाव पाडता आलेला नाही.

संसदेत गोंधळ हाच अजेंडा..

कोणीतरी कार्यक्रम द्यायचे आणि संसदेत गोंधळ करीत राहायचा, या आधारे काँग्रेस बहुमताचा आकडा गाठू शकेल, ही शक्यता अजिबात दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस पक्षाकडे कुठलेही विषय उरले नाहीत, तर पक्ष वाढणार कसा ? सध्या केंद्रात असलेले सरकार पाडून काही चमत्कार करण्याचा प्रयत्न देखील यशस्वी होण्याची परिस्थिती नाही. मग पक्ष टिकणार कसा ? योग्य पावले टाकून शांतपणे काही योजना केली नाही, तर काँग्रेस पक्षाची वाटचाल आत्मघाताकडे होत राहील, हे मात्र नक्की !

काँग्रेसचा विचार थांबतो, तेव्हा..

भारतीय राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्याचे वक्तव्य मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी म्हटले आहे, की काँग्रेसचा विचार ज्या ठिकाणी थांबतो, त्या ठिकाणी मोदींचे विचार सुरू होतात. भारताच्या राजकारणातील हा फरक खूप काही सांगून जातो, याचा विचार करायला हवा !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button