भक्ती शक्ती उद्यानातील 107 मीटर तिरंगा क्रांती दिनी न फडकवल्याने संताप
भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांचा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप

पिंपरी चिंचवडः पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी भक्ती शक्ती उद्यानातील देशातील सर्वात उंच (107 मीटर) तिरंगा फडकवला नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल चार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आणि वार्षिक 46 लाख 85 हजार रुपये मानधन ठेकेदारांना देण्यात येणाऱ्या या ध्वजाचा नियमित फडकावणे अपेक्षित असतानाही, क्रांती दिनी तो न फडकवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, ध्वज खाली घेताना कामगार वर्गाकडून तिरंग्याचा अपमान होतो, आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते.
हेही वाचा : ‘भारताने पाकिस्तानची ६ विमाने नष्ट केली’; भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे मोठे विधान
काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘हर घर तिरंगा’ अभियान 2 ते 14 ऑगस्टदरम्यान राज्यभर राबवले जात असताना, महापालिका प्रशासनाचा त्याकडे दुर्लक्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्ट राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले असतानाही, क्रांती दिनी तिरंगा न फडकवणे हे खेदजनक आहे.
या घटनेमुळे महापालिकेच्या देशभक्तीबाबत आणि जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




