सुप्रिया सुळे थेट मोदींच्या भेटीला: भेटीमागे राजकीय डावपेच की मतदारसंघातील मुद्दे? चर्चांना उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद भवनात दोघांची भेट झाली. मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आपल्या मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न, तथा राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
हेही वाचा – आरे परिसरातील अतिक्रमणांवर प्रतिबंध घाला, नवीन बांधकामांना परवानगी नको’; दुग्धविकास मंत्री अतुल सावे
या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. प्रत्येक पक्षाकडून यासाठी रणनीती आखली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष या निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देखील आहे. तर राष्ट्रवादीचा दुसरा गट हा विरोधात आहे. सत्ताधारी गट आणि विरोधातील गट यांच्यात नेहमी टीका टीप्पणी होत आहे. त्यामुळे प्रत्येकच जण दबावाचे राजकारण करत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.




