निगडी अमरधाम स्मशानभूमी दुरवस्थेत; भाजपचे सचिन काळभोर यांनी व्यक्त केला संताप
स्वच्छता, पाणी व विजेचा अभाव; लाखो रुपये खर्चूनही नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य नाही
पिंपरी-चिंचवड : निगडीतील अमरधाम स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना अस्वच्छता, अपुरी पाणी व वीज व्यवस्था, तुटलेली आसनव्यवस्था आणि गटारांचे उघडे पडलेले झाकण यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी संताप व्यक्त करत महापालिकेच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली आहे.
काळभोर म्हणाले की, “स्मशानभूमी हे केवळ अंत्यसंस्काराचे ठिकाण नाही, तर माणसाच्या जीवनाचा शेवटचा टप्पा शांततेने पार पडण्याची जागा आहे. मात्र, आजच्या घडीला हीच जागा नागरिकांसाठी वेदनादायक बनली आहे.”
हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बेरोजगारांसाठी “भव्य नोकरी महोत्सव”
महापालिकेचा बेजबाबदारपणा
महापालिका प्रशासन दरवर्षी लाखो रुपये ठेकेदारांना स्मशानभूमी स्वच्छतेसाठी मानधन म्हणून देते. परंतु प्रत्यक्षात त्या पैशांची कोणतीही ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिसरात दुर्गंधी, उघडे गटार, मोडकळीस आलेल्या शेड्स आणि अंधारमय वातावरण यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबीयांची मानसिक होरपळ होते.
नागरिकांच्या तक्रारींना मिळतेय ‘आश्वासन’च
स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही परिस्थितीत कोणताही सुधार झाला नाही. “प्रशासनाकडे तक्रार केली की, पुढच्या आठवड्यात काम सुरू होईल,” असे आश्वासन दिले जाते; पण त्या आश्वासनांनाच आता फारसे महत्त्व राहिलेले नाही, असे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले.
सचिन काळभोर यांची मागणी
स्मशानभूमीत तातडीने स्वच्छता मोहीम, विद्युतप्रकाश योजना, बसण्यासाठी नव्या बेंचेस, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि गटार झाकण्याची कामे त्वरित व्हावीत, अशी आग्रही मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे. याबाबत लेखी निवेदन देण्यात येईल आणि पालिकेने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





