आषाढी वारीनंतर परतलेल्या तुकोबांच्या पालखीचे स्वागत यंदा माऊलींच्या आळंदीत होणार!
आळंदी देवस्थानच्या निमंत्रणाला देहू संस्थानकडून होकार

20 जुलै रोजी होणार तुकोबांच्या पालखीचे आळंदीत स्वागत
पिंपरी | नुकतीच आषाढी वारी संपन्न झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी नगरीत स्वागत झाले. देहूच्या संत तुकाराम महाराज पालखीचा परतीचा प्रवास सुरू आहे. याच दरम्यान आषाढ वद्य दशमीचे दिवशी अर्थात 20 जुलै रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीने आळंदीमध्ये स्वागताचा पाहुणचार घ्यावा असे निमंत्रण संस्थांकडून देण्यात आले.या निमंत्रणाला देहू संस्थांनने होकार कळविला आहे. त्यामुळे अनेक वर्षानंतर तुकोबांची पालखी आषाढी वारीनंतर परतीचे प्रवास माऊलींच्या आळंदी नगरीत संपन्न करणार आहे. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळणार असल्याचे देवस्थाने म्हटले आहे.
याबाबतची अधिक माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. ते म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० वे जयंती वर्ष व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठ गमन वर्षाचा दुग्धशर्करा योग या वर्षाचे औचित्य साधून आळंदी देवस्थाने श्री संत तुकाराम महाराज संस्थानला पालखी परतीचे प्रवासात आषाढ वद्य दशमीचे दिवशी आळंदीस मुक्कामी यावे हे निमंत्रण दिले. हे निमंत्रण देहू संस्थांनने स्वीकारले आहे. यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा देहूत परतण्यापूर्वी रविवारी(दि.२०) रोजी श्री क्षेत्र आळंदीत मुक्कामी येणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने दिलेले आमंत्रण जगतगुरु तुकाराम महाराज संस्थानने स्वीकारले असून,आळंदी मुक्कामी येण्याचे कळविले आहे.
हेही वाचा : दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी महापालिका राबवणार व्यापक मोहीम

आठवणींना मिळाला उजाळा!
सन १६८७ साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी पालखी सोहळा सुरू केला.त्यावेळेस जाताना व येताना श्री क्षेत्र आळंदी मार्गेच पालखी प्रवास होत होता त्या आठवर्णीना या निमित्ताने उजाळा मिळत आहे असेही ज्ञानेश्वर वीर म्हणाले.





