लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी दीपिकाने केली नंदीपूजा
गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या दीपिका-रणवीरची लग्नघटिका जवळ येऊ लागली आहे. त्यादृष्टीने या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली असून दीपिकाने लग्नातील पहिली विधी पार पाडली आहे. या विधीचे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
दीपिका-रणवीर येत्या १४-१५ नोव्हेंबरला डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. त्यादृष्टीने या दोघांनीही नवीन आयुष्यासाठी वाटचाल सुरु केली असून दीपिकाने बंगळुरूमध्ये तिच्या राहत्या घरी नंदीपूजेचा विधी पार पाडला आहे. यावेळी दिपीकाच्या घरातल्यांसह जवळचे काही मित्र-मैत्रिणीही उपस्थित होते.
नंदी हा शंकराचं वाहन असल्यामुळे त्याच्याजवळ मनातली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा शंकरापर्यंत पोहोचते असा एक सामान्यपणे समज आहे. त्यामुळे लग्नापूर्वी विवाहसोहळ्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नंदीची पूजा केली जाते. त्यामुळे लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी दीपिकाने नंदीपूजा केली.
दरम्यान, या नंदीपूजा केल्यापासून आता दीपिकाच्या लग्नातील एक-एक विधी पार पाडल्या जाणार आहेत. दीपिका-रणवीरच्या लग्नात एकूण चार सोहळे रंगणार असून ते मुंबईमध्ये एक ग्रॅण्ड रिसेप्शनही देणार आहेत.