भाजपा, संघाच्या समाजसेवेची हमी, ‘मार्केटिंग’ मध्ये मात्र नेहमीच कमी !
भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मातृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या समाजसेवेबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. विमान दुर्घटना असो, महापूर असो, भूकंप असो किंवा कुंभमेळ्यासारखे मोठमोठे सोहळे असोत..तिथे संकट उद्भवले तर मदतीसाठी धावणारी ही मंडळी ! कसलाही गाजावाजा न करता आपले समाजसेवेचे कार्य बिनबोभाटपणे करून समाधानाने परतणारी ही मंडळी..पण, ते कार्य यांनीच केले, हे समाजाला समजायला नको का ? त्यांच्या मते नको.. पण, समाजातील एक प्रवाह आता पुढे येत आहे की याचे ‘मार्केटिंग’ हे झालेच पाहिजे!
न बोलणाऱ्याचे सोने सुद्धा गंजते!
बोलणार्याचे गहू विकले जातात, न बोलणार्याचे सोने सुद्धा विकले जात नाही, ही म्हण म्हणूनच आठवली आणि ती भाजपा आणि संघाला चपखलपणे लागू होते. हा चर्चा करण्याचा मोठा विषय आहे, पण ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे, त्यांना आपण केलेल्या सुकृत्याचा कसलिही प्रसिद्धी नको असते!
पंढरीच्या वारीची परंपरा..
‘पंढरीची वारी’ गेले सुमारे ८०० वर्ष सुरूच आहे. अस्मानी- सुलतानी संकटे आली तरी यात कधीच खंड पडला नाही. निशस्त्र वारकर्यांवर इस्लामी राजवटीत हल्ले होऊ लागल्यावर त्यांच्या रक्षणार्थ धारकरी आले. पण, त्या काळी सुद्धा वारी सुरूच राहिली. स्वातंत्र्यानंतरही वारीत खंड पडलाच नाही. परंतु, गावोगावी ‘हज हाऊस’ उभे करणार्या एकाही सत्ताधार्याला पंढरीची वाट कोसळत्या पावसात चालणारे वारकरी कधी दिसलेच नाहीत, हे आमचे दुर्दैव आहे !
हेही वाचा – राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश
संकटकाळी पहिली धाव संघाची..
सत्ता नसतानाही सत्ताधार्यांशी जुळवून घेत ‘निर्मल वारी’ सुरू झाली आणि वारीचा मार्ग स्वच्छ राहील, महिला वारकर्यांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेणारी एक अराजकीय यंत्रणा त्याकाळी उभी राहिली. एका दिवसात लक्षावधी विठ्ठलभक्त पंढरपुरी येणार, मग त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता लक्षात घेऊन ‘निर्मल वारी’ च्या माध्यमातून वारकरी आणि नागरिकांच्या हिताची आणि आरोग्याची चिंता केली, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने! आणि गेली सुमारे २५ वर्षे हे मिशन संघाची मंडळी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबवत आहेत, कोणतीही धावपळ, गाजावाजा न करता बिनदिक्कतपणे आणि शांतपणे हे कार्य सुरू आहे!
मोक्षाची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी..
मोक्षाची वाट चालणार्या वारकर्याला वाटेत अन्नदान करणारे शेकडो जण पुढे येतात, पण मुसळधार कोसळत्या पावसात चालणार्या वारकर्याला रिफ्लेक्टरसह रेनकोट द्यायला फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. वारकर्यांना रेनकोट दिले गेले, महामार्गावर त्यांच्यासाठी वेगळी वाट बनवली गेली, हे सगळे फडणवीस यांच्या कारकीर्दीत हे अनेकांना माहीतही नाही.
वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा..
या वैष्णव मंडळींचा देव विष्णु जरी क्षीरसागरात बसला असेल आणि साक्षात लक्ष्मी त्याचे पाय चेपत असली तरी आमचा वारकरी तसा दरिद्रीच..बिचारा पंढरीच्या त्या सावळ्या विठ्ठलाच्या मोहात पडून शेकडो किलोमीटर पायाने तुडवत जाणार.. मग ठिकठिकाणी त्याला वैद्यकीय सुविधा प्रदान करणे, त्याच्या पायांना हातांना छान प्रेमाने मसाज करणे, या सुविधा देण्याचे काम कोणाचे? अर्थातच भाजपा आणि संघाचे! आता प्रश्न उपस्थित केला जाईल..हे या आधी होत नव्हते का ? निश्चित होत होते. पण, प्रमाण कमी होते. मग फडणवीस यांनी नेमके नवीन काय केले ? कर्तव्य विरुद्ध आत्मीयता आणि जबाबदारी यातील फरक ज्यांना समजेल, त्यांना फडणवीस यांनी नेमकी काय जादू केली आहे ते उमजेल, हे नक्की !
वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर..
आता दुसरा मुद्दा..हल्ली, वारकर्यांच्या दिंडींना आर्थिक निधी दिला जात आहे. वारकर्यांच्या या पायी प्रवासाला अधिकाधिक सुखकर बनवण्याचे प्रयास होत आहेत. आता वारी विठ्ठल भरोसे नसून महाराष्ट्र शासन आपले कर्तव्य, जबाबदारी आणि आपल्या हातून घडणारी ईश्वर सेवा या भावनेतून वारकर्यांची सेवा करत आहेत आणि हा बदल देवेंद्र फडणवीस यांनी घडवला आहे, हे तरी किती जणांना माहीत आहे!
फडणवीस यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न..
२०१४ ते २०१९ या कालखंडात फडणवीस यांना जेरीला आणायचे जे प्रयास झाले, त्यात तुम्ही आषाढी एकादशीला शासकीय महापूजेला आला, तर आम्ही वारीत साप सोडून देऊ अशी धमकी सुद्धा दिली गेली.. मेंदूला ताण देऊन थोडेसे आठवा..फडणवीस त्या वर्षी गेले नाहीत. नंतर सत्तांतर झाले म्हणून गेले नाहीत. आता परत एकदा दणदणीत बहुमत मिळवून फडणवीस शासकीय महापूजेचा बहुमान उपभोगत आहेत, काहींना ही बाब दुःखाची आहे तर काहींसाठी सुखाची नक्कीच आहे!
धमकी देणारे कुठे आहेत ?
फडणवीस यांनी शांतपणे केलेले काम वारकर्यांच्या हृदयात पोहचले आणि म्हणूनच असे घवघवीत यश मिळाले. साप सोडण्याची धमकी देणारे कोणत्या बिळात जाऊन लपले समजत नाही. फडणवीस यांचा संयम पांडुरंगाला भावला आणि म्हणूनच त्यांना महापूजेचे भाग्य पुन्हा एकदा आणि हक्काने प्राप्त झाले, हे लक्षात घ्या. भाजपा आणि संघाला आपले सोने विकता येत नसेल, हे समजू शकतो.
दिखता हैं, वही बिकता हैं..
परंतु, आजच्या काळातील ‘दिखता हैं, वही बिकता हैं’ या सिद्धांताला समजून घेऊन त्यांच्या पक्षाने तरी सकारात्मक मुद्द्यांचा आक्रमक प्रचार करण्याचे मनावर घ्यावे, असे वाटते. अन्यथा, सत्ता वाचवण्यासाठी केल्या जाणार्या मनोमीलनाचे ओशाळवाणे सोहळेच महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना बघावे लागतील. अर्थात् शेवटी नकली आणि असली यातील फरक जनता जाणते, आणि वेळ आली की नको त्याचे उट्टे काढले जातात, ज्याचे काम आवडते त्याच्या बाजूने भरभरून दान टाकले जाते, तो भाग वेगळा!





