पिंपरी-चिंचवडमधील तात्यासाहेब शेवाळे यांची जागतिक विमा परिषदेसाठी निवड
निगडी शाखेतील ज्येष्ठ विमा प्रतिनिधी अमेरिकेत भारताचं प्रतिनिधित्व करणार

पिंपरी-चिंचवड : एलआयसीच्या निगडी शाखेतील ज्येष्ठ आणि अनुभवी विमा प्रतिनिधी तात्यासाहेब शेवाळे यांची अमेरिकेतील मियामी, फ्लोरिडा येथे होणाऱ्या एमडीआरटी (MDRT) जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद 21 ते 25 जून 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली असून, यामध्ये १२६ देशांतील ३,००० पेक्षा अधिक विमा कंपन्यांचे दहा हजारांहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तात्यासाहेब शेवाळे यांचा ३५ वर्षांचा विमा क्षेत्रातील अनुभव असून, ते पुणे-पिंपरी चिंचवड विभागातून सलग २३ वेळा जागतिक विमा परिषदेसाठी निवडले गेलेले एकमेव प्रतिनिधी आहेत. त्यांनी आपल्या कार्यकौशल्यातून विमा क्षेत्रातील अनेक उच्चतम सन्मान पटकावले आहेत. त्यामध्ये २४ वेळा MDRT आणि १० वेळा COT (Court of the Table) हे उल्लेखनीय आहे. हे दोन्ही पुरस्कार प्राप्त करणारे ते निगडी शाखेतील एकमेव विमा प्रतिनिधी आहेत.
हेही वाचा – नव उद्योजकतेला प्रोत्साहन-चालना देत इंदिरा स्वकीयम घडविणार हजारो उद्योजक : डॉ. तारिता शंकर
या अगोदरही त्यांनी कॅनडा, सिंगापूर, दुबई, मलेशिया, हॉंगकॉंग, टर्की, शांघाय (चीन), ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये पार पडलेल्या परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे एलआयसी, पिंपरी-चिंचवड विभाग, तसेच विमा क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. तात्यासाहेब शेवाळे यांचे कार्य आणि योगदान हे उत्कृष्टता, निष्ठा आणि दीर्घकालीन सेवाभावाचे प्रतीक ठरले आहे.




