Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

हिंजवडी आय़टी पार्कमध्ये अखेर भविष्यकालीन उपाययोजनांचे पाऊल

पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था अस्तित्वात नाही. यामुळे संपूर्ण आयटी पार्कमध्ये पावसाळी वाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे नियोजन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) केले आहे. पावसाळी वाहिन्यांसाठी सर्वेक्षण करण्यासाठी लवकरच सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

आयटी पार्कमध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. पावसाचे पाणी वाहून जाणारे नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आल्याने हे घडत आहे. आयटी पार्कचा विकास होत असताना अनेक गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांनी पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक प्रवाह असलेले ओढे आणि नाले बुजवून त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे पावसाचे पाणी वाहून रस्त्यावर येत आहे. याच वेळी ते पाणी पुढे जाण्यासाठीचा मार्गही अडविण्यात आल्याने ते रस्त्यावर साचत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने आयटी पार्कमध्ये पावसाळी वाहिन्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन केले आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील सध्याची समस्या सोडविण्यासाठी तातडीची पावलेही उचलण्यात येत आहेत. आयटी पार्कमधील टप्पा दोनमध्ये डोहलर कंपनीजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचत आहे. या ठिकाणी एमआयडीसीकडून ९०० मिलिमीटर व्यासाच्या दोन भूमिगत वाहिन्या बसविण्याचे काम सुरू आहे. या वाहिन्यांमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर न येता ते या वाहिन्यांमधून वाहून जाईल. तसेच, तेथून ३०० ते ४०० मीटर अंतरावरही पावसाचे पाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार होत आहे. तेथेही अशाच दोन वाहिन्या बसविण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूंचे नाले बुजले गेले आहेत. या मार्गांवर दोन्ही बाजूला पडलेला मेट्रोच्या कामाचा राडारोडा उचलून हे नाले पुन्हा मोकळे केले जात आहेत, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी दिली.

हेही वाचा –  कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार; अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

आयटी पार्कमधील कंपन्यांना एक थेंबही सांडपाणी बाहेर सोडणार नाही या अटीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली. त्यामुळे या कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात अनेक कंपन्या सांडपाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडत आहेत. हे पाणी सांडपाणी वाहिन्यांतून पुढे शेतीत जात आहे. हे पाणी काळ्या रंगाचे असल्याचेही शासकीय यंत्रणांच्या पाहणीत समोर आले आहे. याचबरोबर काही मोठ्या गृहनिर्माण संस्थांकडूनही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट बाहेर सोडण्यात येत आहे.

हिंजवडीतील आयटी पार्कमधील समस्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. आयटी पार्कमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्याची समस्या निर्माण झाल्याने भविष्यात पावसाळी वाहिन्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यासाठी लवकरच सल्लागार संस्थेतील नियुक्ती करून सर्वेक्षण सुरू केले जाईल.नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, एमआयडीसी

कंपन्यांना परवानगी देताना त्यांनी सांडपाणी बाहेर सोडू नये, अशी अट घेतली जात आहे. कंपन्यांकडून सांडपाणी बाहेर सोडले जात असल्याने याबाबत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांकडूनही सांडपाणी बाहेर सोडले जात असल्याने त्यांचीही तपासणी सुरू आहे.बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button