मूल्यांकनात चुका करणाऱ्या परीक्षकांवर कारवाई नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Mumbai-University-1.jpg)
मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि त्यानंतर निकालातील गोंधळामुळे विद्यार्थी जेरीस आले असताना, उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात चुका करणाऱ्या परीक्षकांवर मात्र कोणतीही कारवाई विद्यापीठाकडून केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना होणाऱ्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराने आणि मूल्यांकनातील त्रुटींमुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालाबाबत शंका असल्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी हजारो विद्यार्थी दर परीक्षेनंतर अर्ज करतात. नुकतेच विद्यापीठाच्या निकालानुसार अनुत्तीर्ण झालेले ३५ हजार विद्यार्थी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण झाल्याचे समोर आले होते. अनुत्तीर्ण झाल्याच्या निराशेतून आत्महत्या केलेली विद्यार्थिनी पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी पुनर्मूल्यांकनासाठीच्या शुल्कातून विद्यापीठाला कोटय़वधी रुपये मिळतात. मात्र मुळात उत्तरपत्रिका तपासताना चुका करणाऱ्या परीक्षकांवर आणि मुख्य परीक्षकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेच्या कामात त्रुटी असल्यास किंवा चुका झाल्यास त्याच्या चौकशीसाठी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून समितीची स्थापना करून त्यांच्या अहवालानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र आजपर्यंत ठोस कारवाई झाली नसल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली.
प्राध्यापकही नाराज
वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे परीक्षा आणि मूल्यमापनाचा ताण वाढत आहे. त्यामुळे प्राध्यापकांना क्षमतेपेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासण्याची वेळ अनेकदा येते. निकाल ठरावीक दिवसांत जाहीर करायचा असल्यामुळे त्यासाठी अनेकदा पुरेसा वेळ मिळत नाही, असे प्राध्यापकांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून विद्यापीठाने पूर्णवेळ नियमित प्राध्यापकांनाच फक्त मूल्यमापनाचे काम देण्याचा निर्णय बदलून कंत्राटी तत्त्वावरील प्राध्यापकांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले. मात्र त्यांच्यावर कारवाई कशी करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे प्राध्यापकांकडून काम करवून घेत निकाल वेळेवर जाहीर करण्याचा ताण आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचा संताप अशा पेचात विद्यापीठ अडकले आहे.