वा भाई वा! आपण मालिका जिंकलो
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/shubham-1-780x470.jpg)
आणि अखेर, निर्भळ यश मिळालं! भारत-इंग्लंड द्विपक्षीय मालिकेत भारताने ३-० असा क्लीन स्वीप करत क्रिकेट जगतात पुन्हा आपला डंका वाजवला. ही मालिका फक्त विजयासाठी नव्हती, तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीची सर्वोत्तम तयारी होती.
शुभमन गिलचा खेळ, कोहलीचा क्लास
सामन्याच्या सुरुवातीला थोडी निराशा झाली होती. रोहित शर्मा केवळ काही धावा काढून बाद झाला. पण शुभमन गिल मैदानात आला, आणि त्यानं जणू चेंडूवर आपलं नाव कोरलं! 102 चेंडूत 112 धावा काढून त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच दमछाक केली. त्याच्या बॅटमधून निघालेल्या प्रत्येक फटक्यावर त्याचा आत्मविश्वास झळकत होता.
विराट कोहलीनेही साथ देत 55 चेंडूत 52 धावा करत स्वतःचा फॉर्म परत मिळवल्याचं दाखवलं. शुभमन आणि विराटची भागीदारी म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीचा परिपाठ होता. त्यानंतर श्रेयस अय्यरने 64 चेंडूत 78 धावांची तडाखेबाज खेळी करत संघाची धावसंख्या 356 पर्यंत पोहोचवली.
इंग्लंडचा संघर्ष फुसका ठरला
इंग्लंडच्या फलंदाजांसाठी भारतीय गोलंदाज एक कठीण आव्हान ठरले. पहिल्या काही षटकांत इंग्लंडला चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्यांचा डाव पटकन गडगडला. कुलदीप यादवच्या फिरकीला इंग्लंडचे फलंदाज सामोरे जाऊ शकले नाहीत, तर वॉशिंग्टन सुंदरने आपल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून दबाव वाढवला.
हेही वाचा : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळाला नवा कर्णधार, जाणून घ्या RCB चा संपूर्ण संघ
हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी मधल्या षटकांत निर्णायक गोलंदाजी करत इंग्लंडला 214 धावांवर गुंडाळलं. गोलंदाजीतील ही कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
सकारात्मकतेची नवी सुरुवात
ही मालिका भारतासाठी केवळ विजय नव्हता, तर एक नवा आत्मविश्वास घेऊन आली आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत, संघाने प्रत्येक क्षेत्रात समन्वय दाखवला. फिरकीतील वैविध्य, वेगवान गोलंदाजांची उभारणी, आणि प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार रोहित शर्माचा परिपूर्ण ताळमेळ या सगळ्यामुळे संघ जिंकण्यासाठी सज्ज आहे.
आता नजर चॅम्पियन्स ट्रॉफीवर
या मालिकेतून आपण ज्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत, त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला मोठा फायदा करून देतील. मैदानावर दाखवलेली एकजूट आणि विजयासाठीची धडपड हीच आपली खरी ताकद आहे.
आता फक्त एकच गोष्ट मनात आहे:
“ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,”
आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनच परत येऊ!
धन्यवाद! भारताचा विजयाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
लेखक: हर्षल आल्पे