‘एआय’च्या नैतिक आणि शाश्वत वापरासाठी धोरण निश्चित करावे लागणार; प्रा. किरणकुमार जोहरे
शिक्षण विश्व: 'एआय' संदर्भात फेसबुक व युटूबवर थेट प्रक्षेपणाद्वारे एक दिवसीय कार्यशाळा
पिंपरी- चिंचवड | जगभरात बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार आपल्यात देखील बदल घडवुन आणणे गरजेचे असून ही काळाची गरजच आहे. त्यासाठी आपली विचारसरणी बदलावी लागेल. भविष्यात आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नैतिक आणि शाश्वत वापरासाठी धोरणे तयार करावी लागतील असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ व व्याख्याते नाशिक येथील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या वतीने महाविद्यालयात ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष जाहीर केल्या प्रित्यर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय ) सर्वांसाठी यात कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट्स कसे काम करते ,त्याच्या प्रभावी वापर कसा करता येईल यासाठी फेसबुक व युटूबवर थेट प्रक्षेपणाद्वारे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ़. दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
व्यासपीठावरती प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज, उपप्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, कार्यशाळेच्या समन्वयिका डॉ राजश्री ननावरे याच्यासमवेत ऑनलाईन सुमारे साडे तीन हजार विद्यार्थी व महाविद्यालयाचे 115 प्राध्यापकांनी सहभाग या एक दिवसीय कार्यशाळेत नोंदविला.
हेही वाचा : ‘एकनाथ शिंदे हे देव माणूस, त्यांचे निर्णय बदलू नका’, पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले फ्लेक्स
व्याख्याते प्रा किरणकुमार जोहरे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, जगभरात बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार आपल्यात देखील बदल घडवुन आणला पाहिजे. त्यासाठी आपली विचारसरणी देखील बदलावी लागेल. ही काळाची देखील गरजच आहे. आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) रोबोट्सच्या नैतिक आणि शाश्वत वापरासाठी धोरणे तयार करावी लागतील. याद्वारे पीक उत्पादनासाठी स्वयंचलित कृषी उपकरणे आणि हवामानाच्या परिणामाच्या अनुमान बांधता येईल. कृषी उत्पन्न वाढीस मदतच होणार आहे. आज अनेक उद्योगांमध्ये अचूक उत्पादन निर्मिती आज रोबोटसचा वापर करण्यात येत आहे. रोबोट्स वैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया करताना वापरात येत आहे. अवकाश संशोधनासाठी मंगळ आणि चंद्रावरही पोहोचले आहे. प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, समजून घेवून विधायक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करू शकतील.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज यांनी केले डॉ. जयश्री मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा रसिका पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ रूपा शहा यांनी करुन दिला तर आभार कार्यशाळेच्या समन्वयीका डॉ राजश्री ननावरे यांनी मानले.