सरकार अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? सरकारनं दिलं स्पष्टीकरण
![Will the government take back the money of ineligible Ladki Bahin Scheme? The government has given clarification](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Will-the-government-take-back-the-money-of-ineligible-Ladki-Bahin-Scheme-The-government-has-given-clarification-780x470.jpg)
Ladki Bahin Yojana | राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ही महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र या योजनेमधून तब्बल ५ लाख महिलांची नावे हटवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
कारण सरकारच्या या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा होतात. मात्र आता सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची पडताळणी सुरू केली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेमधून ५ लाख महिलांची नावे हटवण्यात आली आहेत. याप्रकरणी डिसेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या २.४६ कोटी होती तर जानेवारी २०२५ मध्ये हा आकडा २.४१ कोटी इतका झाला आहे. परंतु, ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : डॉ. आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांनी स्पष्टीकरण देऊन मागितली माफी
मात्र आता यासंदर्भात सरकारकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे आता महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २ लाख ३० हजार महिला आहेत. वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिलांचा आकडा १ लाख १० हजार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला १ लाख ६० हजार आहेत. यासह एकूण अपात्र महिलांची संख्या ५ लाख होत आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.