मुंबईकरांचे ‘मेगा’हाल, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे
![Mumbaikars, 'mega', railways, three, routes, megablocks,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/megablock-780x470.jpg)
मुंबई : संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.
मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे आज रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा काही मिनिटे उशिराने असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?
मुंबई उपनगरीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 यादरम्यान असेल. या मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा – विद्यार्थी खेळाडूंचे प्रस्ताव राज्य बोर्डाने मागवले
कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर रेल्वेचे वेळापत्रक काय?
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे यादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4.40 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी – वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील.
कधी : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कुठे : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल- कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम मार्गिकेवरील स्थानकांवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेची स्थिती काय?
पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड रेल्वे स्थानक ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यादरम्यान चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
कुठे : ग्रॅण्ट रोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. चर्चगेटला येणाऱ्या काही अप लोकल वांद्रे / दादरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.