वाढीव मतदानाचा कीडा, अजून वळवळतोय !
विशेष संपादकीय : अधिकराव दिवे-पाटील, मुख्य संपादक.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/rahul-780x470.jpg)
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदानाची संख्या वाढली, आणि त्यामुळेच ‘महायुती’ चा दणदणीत विजय झाला, हा डोक्यात शिरलेला कीडा अजूनही वळवळतोच आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले त्यांनी पहिल्यांदा या वाढलेल्या मतदार संख्येवर आणि टक्केवारीवर शंका व्यक्त केली.. न्यायालयात धाव घेतली. लोकसभेमध्ये गेल्या आठवड्यात हाच मुद्दा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला, आणि एकूण 76 लाख मतदार कसे वाढले? याचा हिशोबच सरकारकडे मागितला.
हिशेब मागा, वातावरण स्वच्छ आहे
ज्यांनी भारतीय जनता पक्षाला जवळून अनुभवलं आहे, त्यांना माहित आहे की प्रत्येक निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचा एक मोठा कार्यक्रम संघ परिवार आणि भाजपातर्फे हाती घेतला जातो. अशा प्रकारच्या कार्यक्रमाशी उबाठा गट किंवा काँग्रेसचा काडीचाही संबंध नसतो, यामुळे विधानसभेपूर्वी बऱ्यापैकी मतदार वाढलेले होते, हे वेगळे सांगायला नको !
दुसरा मुद्दा मतदान केंद्रावर मतदान संपण्यापूर्वी चे पोहोचले वेळ असतात त्या सर्वांचे मतदान करून घेतले जाते. यावेळी हा आकडा प्रचंड होता, काही ठिकाणी तर मतदान संपण्यासाठी रात्रीचे दहा वाजून गेले, हे विरोधकांना कोण सांगणार ?
पराभवाचे खापर फोडा ‘ईव्हीएम’ वर
पराभव झाला की त्याचे खापर ईव्हीएम वर फोडण्याचा जुना पायंडा संजय राऊत आणि नाना पटोले यांनी यावेळीही सुरू ठेवला. त्याचबरोबर त्यांनी दुसरा मुद्दा उकरून काढला तो म्हणजे डोक्यात वळवळणारा वाढीव मतदानाचा कीडा ! निवडणूक आयोगाकडे वेळोवेळी तक्रार करू नये, आयोगाने या मंडळींचे प्रत्येक गोष्टीत थोबाड फोडले आहे, पण डोक्यातील कीडा काही गप्प बसू देत नाही.
पुन्हा एकदा नव्याने हा मुद्दा त्यांनी चव्हाट्यावर मांडला आहे, कोर्टानेही तो गांभीर्याने घेतला आहे. पण, यावेळी उत्तर वेगळेच मिळणार आहे आणि वाढीव मतदारांचे समर्थन केले जाणार आहे, हे सूज्ञानी लिहून ठेवावे.
राहुल गांधी यांचा थयथयाट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळाले आणि सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक ७० लाख मतदार कसे वाढले, असा प्रश्न त्यांनी लोकसभेत विचारला आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन अहिरे यांची रीट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत. महाराष्ट्रात गत पाच वर्षांत मतदारांची संख्या ३२ लाखांनी वाढली, मग लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यांत मतदारांची संख्या ४८ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त काँग्रेसने पुन्हा एकदा मतदारयादीत त्रुटी असल्याची टीका केली आहे. तसेच आघाडीच्या १०० पराभूत उमेदवारांनी या संदर्भात विविध न्यायालयांत याचिका दाखल केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत सहा वाजल्यानंतर सुमारे ७५ लाख मतदारांनी मतदान केले. परंतु प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेली मते यात मोठी तफावत असल्याचा दावा करून ही निवडणूक रद्दबातल घोषित करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती
पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला
अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली, सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानातील घोळ, त्याबाबतची कागदपत्रे आणि सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाने दिलेला नकार आदी मुद्दे या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांची शंका रास्तच
निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या समितीमार्फत केली जायची.पण आता सरन्यायाधीशांना समितीमधून का हटवण्यात आले असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेता समितीमध्ये आहेत. मोदी आणि शहा बहुमताने निर्णय घेणार आणि विरोधी पक्षनेत्याला त्यांचा निर्णय मान्य करावा लागणार. सरन्यायाधीश सदस्य असते तर समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली असती. त्यामुळे समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेत्याने जायचे कशाला, हा राहुल गांधी यांना पडलेला प्रश्न रास्तच म्हणावा लागेल.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला. चव्हाण म्हणाले, गत पाच वर्षांत ३२ लाख मतदारांची संख्या वाढली आहे. विधानसभा निवडणुकीतही ती वाढली, याचाच अर्थ ‘गोलमाल है भाई गोलमाल है !’ हे पृथ्वीराज चव्हाण यांचे उद्गार काँग्रेसची भूमिका स्पष्ट करतात.
लोकसभेवेळी सगळे ठीक होते का ?
थोडक्यात, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सध्या कॉम्प्युटरचे युग आहे सर्व घटना आणि उलाढाली पारदर्शक होत असतात. विरोधकांना पराभव झाला की मतदार संख्या आणि ईव्हीएम दिसते. आक्षेप घ्यायचा होतासच तर लोकसभा निवडणुकीनंतर का घेतला गेला नाही ? त्यावेळी पण मतदान वाढले होते..आणि जो आक्षेप पूर्ण महाराष्ट्रासाठी घेत आहात, तो बारामतीसाठी का घेत नाही ?