‘ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे’; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन : प्रत्येकाला मनासारखे वाचता येण्यासाठी स्वातंत्र्य हवे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-12-1-780x470.jpg)
मुंबई : युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ ‘ कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ गोऱ्हे यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले.
हेही वाचा – शंभर थकबाकीदारांकडे 334 कोटींचा कर थकीत
प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष पत्रकार शीतल करदेकर, कार्यवाह रवींद्र गावडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, प्रत्येकाला मनासारखे वाचता येण्यासाठी स्वातंत्र्य हवे. मात्र काय वाचावे आणि काय बघावे यावर मुला-मुलींनी नियंत्रण ठेवावे. केवळ मोबाईलवर गुंतून न राहता रोज काहीतरी वाचन करावे, तरच लेखनामध्ये प्रगती होते. दुसऱ्याचे ऐकून घ्यायला शिकले पाहिजे. समाजमाध्यमावर व्यक्त होताना कायद्याच्या चौकटीत राहून लिहिण्याचा प्रयत्न करा नवीन लेखक तयार होत आहेत चांगल्या लेखनाचा अनुभव घ्या, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि इमारत दुरुस्ती पुनर्विकासासाठी निधीचा प्रस्ताव पाठवण्याबाबतही डॉ गोऱ्हे यांनी सूचना केल्या.