पंचवटी साईकिरण धामतर्फे गोदातीरी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी
साईकिरण धामतर्फे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी सर्व सण विधिवत साजरे
![Panchavati, Saikiran, Dham, Godatiri, Thousands, Devotees, Darshan,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/saithama-780x470.jpg)
नाशिक : ‘अन्नदान हेच श्रेष्ठदान’ या विचाराने प्रेरित होऊन पंचवटी येथील साईकिरण धाम संस्था गेल्या ५३ वर्षापासून अखंडित सुरु असलेली मोफत अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे. या उपक्रमांतर्गत दररोज गोदातीरी भाविकांसह भुकेल्या जीवांसाठी निरंतर तेरा तास सेवा देत गरजू आणि उपाशी व्यक्तींना तसेच हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नाची सोय केली जाते.
पंचवटी येथील साईकिरण धामतर्फे गोदातीरी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब, दिव्यांग, भिकारी, मजूर, बेघर रोज असतात. अनेकदा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बाहेरचे जेवण परवडत नाही. तसेच अनेक भिकारी, मजूर देखील दोन वेळच्या पोट भरेल या उद्देशाने याठिकाणी येवून मोलमजुरी करत असतात. यासर्वांना पौष्टिक अन्न मिळावे, त्याचे पोट भरले जावे या निःस्वार्थ हेतूने १९५२ साली साईकिरण धामतर्फे अन्नछत्र सुरु करण्यात आले.
ही अन्नदानाची परंपरा ५३ वर्षापासून अखंडितपणे साईकिरण धामतर्फे कायम राखली गेली आहे. या उपक्रमातंर्गत भाविक, मजुर, भिकारी यांना दररोज ताजे असे पौष्टिक अन्न खाण्यासाठी दिले जाते. दररोज सकाळी आठपासून अन्नदानाला सुरुवात होत आणि रात्री नऊवाजेपर्यंत सेवेकऱ्यांच्या माध्यामातून ही सेवा दिली जात आहे. उपक्रमासाठी संस्थेचे स्वयंसेवक व अन्य कर्मचारी अविरत काम करत असतात. यात सकाळी अन्न शिजवण्यापासून ते वाटपापर्यंत सर्व प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक बघितल्या जातात.
हेही वाचा – १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार? बजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत
सामाजिक कार्यातही सहभाग
साईकिरण धामतर्फे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी, व इतर सर्व सण विधिवत व साजरे केले जातात.या दिवशी देखील सर्वांना मोफत नाष्टापासून ते दुपारी आणि रात्रीचे जेवण दिले जाते. त्यामुळे गरजू, गरीब, मजूर आणि बाहेरुन आलेल्या भाविकांसाठी साईकिरण धाम हे एक आशेचा किरणच ठरत आहे.
कोरोनातही सेवा
मार्च २०२० मध्ये देशात सर्वत्र कोरोना महामारीचे संकट आले होते. या संकटतही साईकिरण धामने आपली सेवा खंडीत न करत गोरगरीबांना मोठी मदत केली हेती. तसेच जेव्हा जेव्हा गोदावरी नदीला पुर येतो तेव्हा देखील ही सेवा खंडित केली जात नाही.
”अन्नदानाची निरंतर सेवा सन १९५२ पासून सुरू असून आजतागायत अखंडपणे हा उपक्रम सुरु आहे. पिढ्यान- पिढ्या दादा, आजोबा, गुरूंपासून ही परंपरा चालत आलेली आहे.”- महंत संतोकदास महाराज.
”अनेक यात्रेकरू जेव्हा लांबून येथे येऊन या सेवेचा उपभोग घेतात तेव्हा त्यांचे मन तृप्त होते. साईबाबांच्या कृपेने आजपर्यंत कसलीही कमी पडली नाही. जे कोणी बाबांच्या दारात येतात ते कधीही उपाशीपोटी जात नाही.”- मनोहर उदासे, ज्योती लोखंडे