जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाची संवर्धन प्रक्रिया
दत्त देवस्थान मठ श्री क्षेत्र आडी परमात्मराज महाराज हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे
![Jotiba, idols, preservation, archaeology, preservation, processes,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/jyotiba-780x470.jpg)
जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मूर्तीची (Jyotiba Dongar) संवर्धन प्रक्रिया काल चार दिवसांनंतर पूर्ण झाली. शनिवारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी करण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी झाल्यानंतर मूर्ती दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली.
या सोहळ्यासाठी दत्त देवस्थान मठ श्री क्षेत्र आडी येथील परमात्मराज महाराज हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत; तर जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडी, तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थानचे अधीक्षक धैर्यशील तिवले प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : जवानांच्या जीवनावर आधारित नाटिकेने उपस्थितांना अश्रू अनावर!
पूर्णा नदीपात्रात सलग दुसऱ्या दिवशी तुटलेल्या अवस्थेत आढळल्या तीन प्राचीन मूर्ती; कोणत्या धर्माच्या आहेत मूर्ती?
दिल्ली येथील केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे पथक सोमवारी डोंगरावर दाखल झाले होते. मंगळवारी मुख्य मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाच्या केंद्रीय पथकातील तंत्रज्ञांना होमहवन मंडपात बसवून विविध धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली होती.
सोमवारी मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात जोतिबा मूर्तीवर धार्मिक विधी करून गाभारा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कासव चौकात श्रींची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. डोंगरावर येणाऱ्या सर्व भाविकांनी या उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले. जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने ही संवर्धन प्रक्रिया राबविली. मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांत ही संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली.